बाजारपेठेच्या मार्गातील ते अडथळे हटवा ; भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी

मालवणात नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर

… अन् मुख्याधिकारी आणि भाजपा कार्यकर्त्यांमधील वाद टळला

मालवण | कुणाल मांजरेकर

गणेश चतुर्थी सण अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपला असताना मालवण बाजारपेठेतील भाजी मार्केट नजीकच्या रस्त्यावर उभारण्यात आलेली पत्र्याची संरक्षक भिंत वाहतूकीला अडथळा ठरत आहे. गणेशोत्सवात ही बाब त्रासदायक ठरणार असून ही भिंत तातडीने हटवण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे केली आहे.

या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, आबा हडकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवा मोर्चा शहराध्यक्ष ललित चव्हाण, मोहन वराडकर, प्रमोद करलकर, नंदू देसाई, निनाद बादेकर, महेंद्र पारकर, राहुल हरजकर, उत्तम पेडणेकर, विद्या मेस्त्री, चंदू आचरेकर, आप्पा मोरजकर, नारायण लुडबे, तुळशीदास लुडबे, बाळू शिंदे, राजू बिडये आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोकणातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेश चतुर्थी. यावेळी मालवण बाजार पेठ येथे मोठा भाजी बाजार बसत असतो. सद्य स्थितीमध्ये जुने भाजी मार्केटचे काम सुरू आहे. त्याच ठिकाणी जाण्या येण्याच्या मार्गावर बांधकाम सुरक्षेसाठी तात्पुरत्या स्वरूपात पत्राची संरक्षण भिंत उभी केली आहे. आता भाजी मार्केटचे तळमजल्याचे बरेच काम झाले आहे. रस्त्यावरच उभी असलेली पत्र्याची संरक्षण भिंत काढून टाकण्याबाबत ठेकेदाराला निर्देश दयावेत. यामुळे नागरीकांना व व्यवसाईकांना सुलभ होणार आहे. तरी लवकरात लवकर भाजी मार्केट मधील पत्र्याची संरक्षण भिंत बाजूला करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

… अन् वाद टळला !

माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर यांच्यासह भाजपाचे शिष्टमंडळ मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी नगरपालिकेत गेले असता मुख्याधिकारी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत व्यस्त होते. यावेळी श्री. आचरेकर यांनी आम्ही सर्वजण निवेदन देण्यासाठी आलो आहोत, याची माहिती मुख्याधिकाऱ्यांना द्या, अशी सूचना पालिकेच्या कर्मचाऱ्यांना केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी केवळ चार जणांच्या शिष्टमंडळाने निवेदन देण्यासाठी आत यावे, अशी सूचना केली. मात्र याला सुदेश आचरेकर यांनी आक्षेप घेतला. आम्ही नेहमीच तुमच्या चांगल्या कामाला चांगले म्हटले आहे, त्यामुळे विनाकारण कोणतेही वाद आम्हाला करायचे नाहीत. त्यामुळे निवेदन स्वीकारायचे असेल तर सर्व कार्यकर्ते आत मध्ये येतील, अन्यथा निवेदन स्वीकारू नका असे सांगितले. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केबिनमध्ये येण्यास मान्यता दिल्याने भाजप कार्यकर्ते अन मुख्याधिकाऱ्यांमधील वाद टळला.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!