सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा वाडीजोड कार्यक्रम राबवावा …

आ. नितेश राणेंची सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे मागणी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाव व वाडी वस्तीवरील ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी जिल्ह्यात वाडीजोड कार्यक्रम राबविण्यात यावा, अशी मागणी भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

कोकणातील विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील गावे व वाड्या या विखुरलेल्या असल्याने तेथील वास्तव्यास असलेल्या जनतेची वर्षानुवर्षे दळणवळणाची गैरसोय होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही गावामध्ये गेल्यास त्या गावामध्ये कमीतकमी ८ ते १० वाड्या असतात आणि यापैकी बऱ्याच वाड्या या एकमेकांपासून लांबच्या अंतरावर असतात. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या ग्रामस्थांची गैरसोय होते तशाच प्रकारची गावातील ग्रामस्थांची पण एका वाडीतून दुसऱ्या वाडी मध्ये जाण्याची गैरसोय होते. यापैकी बरेचसे वाडी जोडणारे कच्चे रस्ते हे ग्रामपंचायतच्या मालकीचे, ग्रामिण मार्ग या दर्ज्याचे असतात व अशा रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी ग्रामविकास खात्याकडून निधी उपलब्ध करून दिला जात नाही.

यापूर्वी काही वर्षांपूर्वी या रस्त्यांच्या सुधारणा व डांबरीकरणासाठी वाडीजोड कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यामध्ये ग्रामिण भागातील वाडी वस्ती जोडणाऱ्या मार्गाच्या डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खास बाब म्हणून निधीची उपलब्धता करून देण्यात आली होती. त्यामुळे याचा दळणवळणाचा फायदा ग्रामिण जनतेला झाला होता.तशाच प्रकारचा म्हणजे वाडीजोड कार्यक्रम परत एकदा आपल्या विभागामार्फत राबविण्यात यावा, अशी मागणी आ. राणेंनी केली आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!