हरिहरेश्वरमधील “त्या” संशयास्पद बोटीचं प्रकरण गंभीर ; मोठ्या प्रमाणात घातपात घडवून आणण्याचा कट ?

भाजपा नेते निलेश राणेंची भीती ; पुन्हा २६/११ सारखा हल्ला घटना घडणार नाही याबाबत सुरक्षा यंत्रणेने दक्षता घ्यावी

मालवण | कुणाल मांजरेकर

रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनारी एके ४७ सारखी अत्याधुनिक शस्त्रास्त्र असलेली बोट मिळून आली आहे. मात्र अद्यापही सुरक्षा यंत्रणेने या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेतलेली नसल्याचे दिसून येते. या बोटीवर नेमके कोण होते, आणि येथून कोणत्या वाहनाने ते कोठे गेले, त्यांच्याकडे आणखी कोणकोणत्या प्रकारची शस्त्रास्त्रे होती, याबाबत कोणतेही स्पष्टीकरण सुरक्षा यंत्रणा अद्याप पर्यंत देऊ शकलेले नाही. ही बाब अतिशय गंभीर आहे. २६/११ रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवादी कोकणातून समुद्रमार्गे येथे दाखल झाले होते. त्यामुळे गणेशोत्सव सण तोंडावर असताना पुन्हा एकदा २६/११ सारखी अनुचित घटना घडणार नाही, याची खबरदारी सुरक्षा यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. हा विषय राष्ट्रीय सुरक्षेची निगडित असल्याने या संपूर्ण प्रकारामागील वस्तुस्थिती देशासमोर आणली पाहिजे, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यात हरीहरेश्वरमध्ये काही दिवसांपूर्वी संशयित बोट सापडली होती. त्यावर काही प्रमाणात एके ४७ सारखी हत्यारे मिळून आली आहेत. मात्र अद्यापही या प्रकरणी सुरक्षा यंत्रणा ठोस माहिती देऊ शकलेली नाही, याबाबत भाजपा नेते निलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाच पूर्ण माहिती नाही. त्या बोटीवर जे कोण होते ते अगोदरच सटकले आणि अद्याप सापडलेले नाही. फ्रिजमध्ये आणि बोटीवर सापडलेलं सामान यावरून मोठ्या घातपातचं लक्षण दिसत आहे. त्यामुळे यंत्रणेने गंभीरतेने याकडे लक्ष द्यावं, अशी मागणी त्यांनी ट्विटरवरून केली आहे.

याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना निलेश राणे म्हणाले, रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वरला जी संशयास्पद बोट सापडली, अजूनपर्यंत त्या बोटीवर कोण होते, ते कुठे गेले, त्यांच्या बरोबर काही सामान होतं का ? आणि ते काय काय घेऊन तेथून सटकले, त्याबाबत अजूनपर्यंत कोणालाही स्पष्ट काही कळलेलं नाही. ही फार गंभीर बाब आहे. २६/११ चा हल्ला झाला होता, ते असेच समुद्राच्या मार्गाने आले होते. त्यामुळे ह्या बोटीवरून आलेले नेमके गेले कुठे, कसे गेले ? गणेशोत्सव सण जवळ आला आहे. त्यामुळे काही अधिकाऱ्यांना निलंबित करून हे प्रकरण कोणी हलक्यात घेऊ नये. यंत्रणेने यावर गंभीरपणे लक्ष दयावे, असे त्यांनी म्हटले आहे.

बोटीवर काही प्रमाणात हत्यारे सापडली, फ्रिज मध्ये जे जेवणाचे सामान होते, ते कुजलेले नव्हते. त्याअर्थी काही वेळापूर्वीच कोणीतरी खाऊन पिऊन तेथून निघून गेले होते. ते किती जण होते ते कळण्याचा मार्ग नाही. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुन्हा देशात, आपल्या राज्यात २६/११ सारखी घटना घडू नये याची खबरदारी घ्यावी. खवळलेल्या समुद्रात ते इथपर्यंत आले, उद्या ते काही घडवून गेले तर आपण ते सहन करू शकणार नाही. म्हणून सरकारने याची गंभीर दखल घेऊन यावर तातडीने मार्ग काढून ह्या बोटीवरून कोण पळाले, ते शोधून हे प्रकरण देशासमोर आणले पाहिजे. कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा विषय आहे, आणि तो देशासमोर आणला पाहिजे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!