दत्ता सामंत “ॲक्शन” मोड मध्ये ; गणेश चतुर्थी नंतर निलेश राणेंसह विभागवार बैठका घेणार
जि. प., पं. स. सह नगरपालिका निवडणूकीत भाजपाला १०० % यश मिळवून देणार
कुंभारमाठ येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत दत्ता सामंत यांचा निर्धार
दत्ता सामंत यांच्यात चांगल्या संघटकाचे नेतृत्वगुण ; विलास हडकर यांनी केलं कौतुक
मालवण | कुणाल मांजरेकर
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने रविवारी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे आक्रमक नेते दत्ता सामंत ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले. या रॅलीनंतर ज्येष्ठ नेते विकास हडकर यांच्यासह दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली कुंभारमाठ मध्ये घेण्यात आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये दत्ता सामंत यांनी आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीचे रणशिंग फुंकले आहे. या सर्व निवडणूकांमध्ये भाजपला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी आपण सक्रियपणे कार्यरत राहणार आहोत. यासाठी गणेश चतुर्थी नंतर भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांच्यासह मालवण तालुक्यात विभागवार बैठका घेऊन नव्या जुन्या कार्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात भाजपा कार्यकर्त्यांची तातडीची बैठक रविवारी ज्येष्ठ भाजपा नेते विलास हडकर आणि दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, माजी सभापती सुनील घाडीगावकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष ललित चव्हाण उपस्थित होते. या बैठकीत बोलताना दत्ता सामंत यांनी आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आपण सर्वजण भाजपाचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आपल्या पक्षाचे स्थान बळकट करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत १०० % यश संपादन करण्याच्या हेतूनेच कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. आगामी नगरपालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आपले १०० % उमेदवार निवडून आणण्यासाठी माझे स्वतःचे प्रयत्न राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसातील १८-१८ तास काम करतात. त्यामुळे आपण कार्यकर्त्यांनी किमान दिवसातील दोन ते तीन तास तरी पक्षसेवेसाठी तसेच सामाजिक कार्यासाठी दिले पाहिजेत. मी १९९० सालापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. कोणत्याही बैठकीत आपण दिसून येत नसलो तरी आजही दिवसातून चार ते पाच तास सामाजिक कार्यासाठी आपण देतो. याचा येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला निश्चितपणे फायदा होणार आहे. त्यामुळे अंतर्गत मतभेद आणि रुसवे फुगवे सोडून पक्ष देईल त्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत. माजी खासदार निलेश राणे मागील वर्षभर सक्रियपणे कुडाळ मालवण तालुक्यात कार्यरत आहेत. त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी आपण स्वतः गणेश चतुर्थी नंतर निलेश राणेंच्या उपस्थितीत भाजपाच्या विभागवर बैठका घेणार आहोत असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ नेते विलास हडकर यांच्या अभ्यासपूर्ण वकृत्वाचा त्यांनी गौरव केला. विलास हडकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांचा आपणाला सहवास लाभला तर आपल्या बौद्धिक ज्ञानात निश्चितपणे भर पडणार आहे. हिंदुत्व आणि राष्ट्रभक्ती त्यांच्या नसानसात भिनली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.
ही कोणत्याही गटाची नाही, भाजपची बैठक : विलास हडकर यांनी केलं स्पष्ट
भाजपाचे ज्येष्ठ नेते विलास हडकर यांनी बैठकीच्या प्रारंभीच आज आयोजित केलेली बैठक कोणत्याही गटाची नसून भाजपाची बैठक असल्याचे स्पष्ट केले. तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपाचे कार्यकर्ते सहभागी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दत्ता सामंत यांनी तातडीने आपल्या पक्षाचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी ही बैठक आयोजित करून उत्तम संघटकाचे गुण आपल्यात आहेत, हे दाखवून दिल्याचे विलास हडकर म्हणाले. निवडणुका कशा जिंकायच्या, याचे सूत्र दत्ता सामंत यांना चांगलेच ज्ञात आहेत. त्यामुळे आगामी निवडणुका युवा नेते निलेश राणेंसह दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली लढवल्या गेल्या तर भाजपाला ग्रामपंचायती पासून लोकसभेपर्यंत निश्चितपणे यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात राजकीय स्थित्यंतरे होत आहेत. आज कणकवली मतदारसंघात भाजपाचा आमदार कार्यरत आहे, येणाऱ्या निवडणुकीत कुडाळ – मालवण सह सावंतवाडी मतदारसंघातही भाजपाचा आमदार निवडून आणून संपूर्ण जिल्हा भाजपामय करण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, असे सांगून आज देशात मोदी लाट असली तरीही कोणत्याही कार्यकर्त्याने निवडणुकीत गाफीलपणा दाखवू नये. नारायण राणे यांच्या सारखा नेता आपल्या पक्षात आल्यामुळे त्यांचे असंख्य कार्यकर्ते भाजपाशी जोडले गेले आहेत. त्यामुळे या क्षणी जिल्ह्यात भाजपा ६०% आणि इतर पक्ष ४०% एवढ्या संख्येत असून ही परिस्थिती याहून अधिक चांगली करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेशी संवाद ठेवून त्यांचे प्रश्न वरिष्ठांच्या माध्यमातून सोडवून घ्यावेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा तीन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. केंद्रातला एक मंत्री तीन तीन दिवस ज्याअर्थी आपल्या जिल्ह्याला वेळ देतो, त्याअर्थी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना किती गांभीर्याने विचार करत आहे, याचा प्रत्यय कार्यकर्त्यांनी घ्यावा. आपल्या पक्षाला यश मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी. येत्या पाच ते सहा महिन्यात नगरपालिका, पंचायत समिती जिल्हा परिषदेसह ग्रामपंचायतच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या कार्यकर्त्यांच्या निवडणूका आहेत, यामध्ये यश मिळवण्यासाठी कामाला लागा, असे विलास हडकर म्हणाले.
मालवण नगरपालिकेत २० पैकी २० ही जागा निवडून आणूया : सुदेश आचरेकर
माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी आगामी मालवण नगर परिषदेच्या निवडणुका निलेश राणे यांच्यासह दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली लढवण्याची गरज अधोरेखित केली. पालिकेवर मागील पाच वर्ष आपली सत्ता नसल्याने शहराचा विकास खुंटला आहे. तसेच प्रशासकीय राजवटीतही अनेक कामे रखडली असून शहराच्या विकासाला गती देण्यासाठी भाजपा शिवाय पर्याय नाही. आज केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सक्षमपणे वाटचाल करत असून राज्यातही शिंदे गट आणि भाजपाचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे मालवण नगरपरिषदेत २० पैकी २० ही जागा निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी जोर लावणे आवश्यक असल्याचे सुदेश आचरेकर म्हणाले. यापूर्वी नगरपालिकेच्या १७ पैकी १६ जागांवर आपण विजय मिळवला होता. त्यामुळे आता २० पैकी २० जागांवर विजय मिळवणे आपल्यासाठी कठीण नाही. त्यासाठी दत्ता सामंत यांचे बळ मिळणे आवश्यक आहे. मागील नगरपालिका निवडणुकीत आमच्याच काही चुकांमुळे शिवसेनेची सत्ता आली. मात्र अशा चुका यापुढे होणार नाहीत याची काळजी घेऊया. मागील २५ वर्षात आम्ही कधीही पराभव बघितला नाही. आमचा पराभव करण्याची क्षमता विरोधकांमध्ये नाही. पण आपलीच माणसे आपला पराभव करू शकतात. त्यामुळे यापुढे आपण एकजुटीने राहून मालवण नगरपरिषदेवर एकहाती भाजपचा झेंडा फडकवूया असे आवाहन सुदेश आचरेकर यांनी केले. सूत्रसंचालन आप्पा लुडबे यांनी करून आभार मानले.