बंद स्ट्रीटलाईट, घरगुती वीज समस्यां विरोधात मालवणात भाजपा आक्रमक

तीन ते चार दिवसांत शहरातील सर्व स्ट्रीटलाईट सुरू करण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही

मालवण | कुणाल मांजरेकर

गणेश चतुर्थी सण अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र शहरातील बहुतांश स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून अनेक ठिकाणी घरगुती वीज पुरवठ्यातील अडचणी कायम आहेत. या विरोधात शुक्रवारी भाजपने मालवणात आक्रमक पावित्रा घेत वीज वितरणचे सहायक अभियंता श्री. साखरे यांना जाब विचारला. यावेळी येत्या ३ ते ४ दिवसांत शहरातील सर्व स्ट्रीट लाईट सुरू केल्या जातील, तसेच गणेश चतुर्थी पूर्वी शहरातील वीजेच्या सर्व समस्या मार्गी लावल्या जातील, अशी ग्वाही सहायक अभियंता श्री. साखरे यांनी दिली.

भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी वीज वितरण कार्यालयाला धडक दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, आप्पा लुडबे, जगदीश गावकर, ममता वराडकर, राजू बिडये, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष महेश सारंग, युवा शहराध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, विलास मुणगेकर, उत्तम पेडणेकर, प्रभाकर देऊलकर, पंकज पेडणेकर, विकी चोपडेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सहाय्यक अभियंता साखरे आणि भुजबळ यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली.

गणेश चतुर्थी कालावधीत विनाखंडीत वीजसेवा : सहा. अभियंता साखरे

भाजपा पदाधिकाऱ्यांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्याची ग्वाही सहायक अभियंता साखरे यांनी दिली. येत्या तीन ते चार दिवसांत शहरातील सर्व स्ट्रीट लाईट १०० % सुरू होतील, अशी ग्वाही देऊन गणेश चतुर्थी कालावधीत नैसर्गिक आपत्ती वगळता विनाखंडीत वीज पुरवठा देऊ, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महावितरणचे अधिकारी मिळून एकमेकांच्या समनव्यातुन प्रयत्न करू, असे श्री. साखरे म्हणाले.

शहरात विजेच्या अनेक समस्या आहेत. अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद आहेत. गणेश चतुर्थी सण जवळ आला असताना बंद स्ट्रीट लाईट मुळे पादचाऱ्यांची गैरसोय होणार आहे, याकडे सुदेश आचरेकर यांनी लक्ष वेधले. महावितरणकडे साहित्याची देखील कमतरता असून साहित्य नाही तर कामे कशी करणार ? तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्या
वरिष्ठांपर्यंत पाठवा, त्यासाठी आम्ही देखील पाठपुरावा करू, असे सुदेश आचरेकर, दीपक पाटकर म्हणाले. तसेच किमान गणेश चतुर्थी कालावधीत तरी कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करा, तसेच ग्राहकांचे फोन रिसिव्ह करा, असेही त्यांनी सांगितले. गणेश चतुर्थी तोंडावर असल्याने बाजारपेठेतील वीज पुरवठा सुरळीत राहिला पाहिजे, त्यामुळे परिसरातील ट्रान्सफॉर्मरमधील संभाव्य बिघाड दूर करा, असे सुदेश आचरेकर म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!