मालवणवासीयांकडून एकतेचे दर्शन ; समूह राष्ट्रगानसाठी केलेली मानवी साखळी लक्षवेधी…
मालवण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालवण नगरपालिकेच्या वतीने आयोजित समूह राष्ट्रगान कार्यक्रमात शहरात शालेय विद्यार्थ्यांची मानवी साखळी तयार करून मालवणवासीयांनी या उपक्रमात सहभागी होत सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रगीत म्हणत एकतेचे दर्शन घडविले.
समूह राष्ट्रगान कार्यक्रमासाठी शहरात मालवण पालिका ते भरड नाका आणि भरड नाका ते बाजारपेठ मार्गे नगरवाचन मंदिर अशी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मानवी साखळी करण्यात आली. यात भंडारी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, टोपीवाला हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे विद्यार्थी, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच ठिकठिकाणी नागरिक जमले होते. यावेळी अकरा वाजण्याच्या आधी पालिकेकडून भोंगा वाजवून सूचना देण्यात आली व त्यानंतर ११ वाजता राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. यावेळी शहरात सर्वानी आपापल्या जागी उभे राहून राष्ट्रगीत म्हटले.
या उपक्रमात पालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे व अधिकारी वर्ग, मालवण व्यापारी संघ, भाजपचे पदाधिकारी, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे पदाधिकारी, व्यावसायिक, सामाजिक संस्था, भंडारी हायस्कुल व टोपीवाला हायस्कुलचे शिक्षक, महिला बचत गट यांसह नागरिक सहभागी झाले होते.