स्वातंत्र्य दिनी होणार सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना

पर्यटन उद्योजक दामोदर तोडणकर यांची माहिती

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्स, स्कुबा डायविंग व्यावसायिक तसेच पर्यटन क्षेत्राशी निगडित व्यावसायिक यांना एकत्र करून सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी किल्ले सिंधुदुर्गच्या साक्षीने महासंघाची कार्यकारणी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती पर्यटन उद्योजक दामोदर तोडणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी व खाडी किनारपट्टीवर जलक्रीडा व्यवसायिक व पर्यटन व्यावसायिक यांनी मोठ्या मेहनतीने पर्यटन व्यवसाय उभे केले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीत या सर्व व्यवसायिकांचे महत्वाचे योगदान आहे. मात्र शासन स्तरावरील प्रश्न असो अथवा अन्य समस्या असो नेहमीच या व्यवसायिकांना संघर्ष करावा लागला. तरी पर्यटन व्यावसायिकांच्या न्याय हक्कांसाठी त्यांची स्वतःची हक्काची संघटना असावी या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक महासंघाची स्थापना केली जाणार आहे. अनेक पर्यटन व्यवसायिक यांच्या चर्चेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. जलक्रीडा व पर्यटन व्यवसायिक यांची एकत्रित बैठका तसेच व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेऊन एकमताने महासंघाची कार्यकारणी निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती दामोदर तोडणकर यांनी दिली आहे.

टूर्स व्यावसायिकानाही सॊबत घेणार

पर्यटन व्यवसायात टूर्स व्यवसायिकांचे महत्वाचे स्थान आहे. या दृष्टीने कार, रिक्षा व अन्य वाहने जी पर्यटन सफर घडवतील यांना एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे. जेणेकरून स्कुबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स यासाठी येणारे पर्यटक जिल्ह्याची पर्यटन सफर करतील. त्या पर्यटकांसाठी पर्यटन स्थळांची पॅकेज निश्चिती करावी. यासाठी टूर्स व्यवसायीकाना सोबत घेऊन महासंघ काम करणार आहे. आपण सगळे एक आहोत. या भावनेतून एकत्र येऊया, असे आवाहन दामोदर तोडणकर यांनी केले आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!