शिवसेनेवर दावा करताय… “शिवसेना” शब्दाचा अर्थ तरी माहीत आहे का ? शिवसेनेच्या स्थापनेवेळी तुम्ही होता कुठे ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचा सवाल
शिवसेना वाचवण्यासाठी जुने शिवसैनिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत
वैभव नाईकांचा आम्हाला अभिमान ; विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार
मालवण | कुणाल मांजरेकर
१९६६ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मुंबई आणि त्यानंतर सिंधुदुर्गात शिवसेनेची शाखा सुरू करण्यात आली. त्यावेळी शिवसेनेची पाळेमुळे रुजवण्यासाठी आम्ही निष्ठावंत शिवसैनिक कोकणासह मुंबईत ठाण मांडून होतो. त्यावेळी एकनाथ शिंदे होते कुठे ? संघटना स्थापन करताना “शिवसेना” हा शब्द बाळासाहेब ठाकरेंनी कोणत्या अर्थाने वापरला याचे उत्तर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गद्दार गटाने द्यावे, असे आव्हान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी दिले आहे. आज शिवसेना संकटात आहे. हे चित्र आमच्या सारख्या निष्ठावंत सैनिकांसाठी वेदनादायक आहे. आज जरी वयोमानानुसार प्रकृती साथ देत नसली तरी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी आम्ही कोकण आणि मुंबईतील जुन्या शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे, असा इशाराही भाई गोवेकर यांनी दिला आहे.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी बुधवारी येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदार- खासदारांवर त्यांनी सडकून टीका केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख बाबी जोगी, मंदार केणी, गणेश कुडाळकर, दीपक देसाई, प्रसाद आडवलकर, मोहन मराळ, दत्ता पोईपकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाई गोवेकर म्हणाले, १९६६ मध्ये शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर सावंतवाडी आणि मालवणात शिवसेनेची शाखा सुरू करण्यात आली. आम्ही सर्व शिवसैनिकांनी यासाठी पुढाकार घेतला. त्यावेळी स्वतः बाळासाहेब ठाकरे उपस्थित होते. साहेबांचे मालवणवर विशेष प्रेम होते. त्यांनी त्यावेळी मालवणात जाहीर सभा घेतली. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असताना आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. त्यामुळे आमचे दोघांचे मित्रत्वाचे संबंध होते. परंतु त्यावेळी एकनाथ शिंदे कुठेही दिसले नाहीत. आम्हालाही आमदार, खासदार होता आले असते, मात्र आमच्यासारख्या हजारो शिवसैनिकांनी केवळ “शिवसेना” या शब्दाशी एकनिष्ठ राहून संघटना वाढविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. त्यामुळेच आज महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा डौलाने फडकत आहे.
… म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंसोबत : भाई गोवेकर
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या शिवाजीपार्क मधील शेवटच्या सभेत बोलताना “माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळण्याची जबाबदारी तुमची” असा आदेश तमाम शिवसैनिकांना दिला होता. त्यानंतरच्या काळात बाळासाहेबांनंतरही शिवसेना संघटना मजबूत करण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्याची संपूर्ण जगाने दखल घेतली. आम्हा जुन्या शिवसैनिकांसाठी बाळासाहेबांचा शब्द हा अंतिम आहे. आणि दादरच्या शेवटच्या सभेत बाळासाहेबांनी स्वतः उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळण्याचे आदेश आम्हाला दिल्याने मातोश्री आणि ठाकरे घराण्याशी एकनिष्ठ असलेले आम्ही जुने शिवसैनिक उध्दव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे भाई गोवेकर म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी आली. त्यावेळी शिवसेनेत उद्धव ठाकरे नंतर एकनाथ शिंदे यांना मानाचे स्थान होते. मात्र याचाच गैरफायदा घेत त्यांनी शिवसेना संघटना पोखरण्यास सुरूवात केली. ज्या ठाकरेंनी तुम्हाला प्रेम, विश्वास आणि जबाबदारी दिली, त्याच ठाकरे घराण्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. आता या कृतीला ते बंड म्हणत असतील तर ते अत्यंत चुकीचे असून हे सर्व आमदार, खासदार गद्दार आहेत. आज आनंद दिघे हयात असते तर एकनाथ शिंदे यांची गद्दारी करण्याची हिम्मत झाली असती का ? असा संतप्त सवाल भाई गोवेकर यांनी केला. १९६६- ६७ मध्ये शिवसेना रुजवण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. मात्र आता शिवसेना वाचवण्यासाठी आम्ही जुन्या शिवसैनिकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला असून जुने शिवसैनिक आक्रमक झाले तर या गद्दारांना पळता भुई थोडी होईल असा संतप्त इशारा भाई गोवेकर यांनी दिला आहे..
वैभव नाईकांचा आम्हाला अभिमान ; विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करणार
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनेकांना आमदार, खासदार बनवून मंत्रिपदे दिली. यातील अनेक जण गद्दार निघाले. मात्र अशाही परिस्थितीत आमदार वैभव नाईक शिवसेनेशी आणि मातोश्रीशी एकनिष्ठ राहिले. त्यांनादेखील शिंदे गटात जाण्यासाठी अनेक प्रलोभने मिळाली. मात्र याकडे त्यानी ढुंकूनही पाहिले नाही. शिवसेनेच्या संकटाच्या काळात पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्या आमदार वैभव नाईक यांचा आम्हा जुन्या शिवसैनिकांना सार्थ अभिमान आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणीही उमेदवार असला तरी त्याचे डिपॉझिट जप्त करणारच, असा निर्धार भाई गोवेकर यांनी बोलून दाखवला.
उदय सामंत, दीपक केसरकर उपरे ; गद्दारांना इतिहास माफ करणार नाही
सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार दीपक केसरकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. मुळात हे दोघेही शिवसेनेची एकनिष्ठ नव्हते. काँग्रेस, राष्ट्रवादी मधून ते पक्षात आले होते. असे असतानाही उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रीपदे दिली. मात्र त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे भविष्यात निष्ठावंत शिवसैनिकांचा प्राधान्याने विचार होईल, असा विश्वास भाई गोवेकर यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे यांना स्वतःवर विश्वास असेल तर त्यांनी बाळासाहेबांचे नाव न घेता स्वतःची ताकद दाखवावी. हे सर्वजण भाजपाला विकले गेले असून त्यांनी मातोश्रीच्या पाठीत खंजीर उपसला आहे. त्यामुळे इतिहास या सर्वांना कधीही माफ करणार नाही, असे भाई गोवेकर म्हणाले.