कंत्राटी कामगार रघुवीर पांचाळ याला अशोक सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र
येणारा काळ कंत्राटी कामगारांच्या भवितव्याचाच ; सावंत यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण : जिल्ह्यातील काही कंत्राटी कामगारांना महावितरणच्या ८५ टक्केच्या परिपत्रकामुळे कमी केले होते. यात कमी केलेल्या काही कामगारांना काही दिवसांपूर्वी तर आज देवगड येथील रघुवीर पांचाळ या कामगाराला सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी कंत्राटी कामगार धोंडू पवार, रुपेश जाधव, हरेश लांबोरे आदी उपस्थित होते. सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटनेची मासिक सभा नुकतीच कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कामगार हिताचे निर्णय मांडण्यात आले. संपूर्ण राज्यात ९५ टक्के नव्हे तर १०० टक्के कंत्राटी कामगार भरतीसाठी सिंधुदुर्ग वीज कंत्राटी कामगार संघटना प्रयत्नशील राहणार आहे. आपली लढाई ही खूप जवळ आली आहे. शासनाकडून फक्त तोंडी आश्वासन नको तर कृती हवी यासाठी आपली संघटना बांधील आहे. त्यामुळे येणारा काळ हा नक्कीच कंत्राटी कामगारांच्या भवितव्याचा काळ असेल असे श्री. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.