वायरी भूतनाथ मधील “त्या” अपूर्ण रस्त्याचे काम तात्काळ सुरू न केल्यास १५ ऑगस्टला रास्तारोको करणार
भाजयुमोचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मंदार लुडबे यांचा इशारा
रांजेश्वर पुलानजिकचे जोडरस्ते देखील पूर्ण करण्याची मागणी : सा. बां. विभागाला निवेदन सादर
मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण तालुक्यातील तारकर्ली ते देवबागकडे जाणाऱ्या रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे. या मार्गावरील ९० % काम पूर्ण झाले असून वायरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माणगांवकर काजू फॅक्टरी पर्यंतचे १० % काम ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहे. ठेकेदाराच्या राजकीय पक्षाशी असलेल्या साटेलोट्यामुळे हे काम रखडले असून यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तातडीने हे काम सुरू न केल्यास १५ ऑगस्टला याठिकाणी रास्तारोको करण्याचा इशारा भाजयुमोचे जिल्हा कार्यकारणी सदस्य मंदार लुडबे यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्यात आले आहे.
वायरी – तारकर्ली- देवबाग रस्ता डांबरीकरण आणि कॉंक्रिटीकरण करणे हे काम मंजुर आहे. यातील ९० % काम पूर्ण झाले असून वायरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते माणगावकर काजू फॅक्टरी पर्यंतचा रस्ता ठेकेदाराने अपूर्ण ठेवला आहे. त्यामुळे पावसामुळे या भागात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. याठिकाणी काँक्रीटीकरण मंजूर आहे. परंतु, काही ग्रामस्थांनी येथे काँक्रीटीकरणा ऐवजी डांबरीकरण करण्याची मागणी केल्याने हे काम शिल्लक ठेवल्याचे ठेकेदार सांगतो. हे काम शासनाने मंजूर केले असून वर्क ऑर्डरही शासनाने दिली आहे, कोणी ग्रामस्थांनी नव्हे. त्यामुळे ठेकेदाराने मंजूर काम पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र सदरील ठेकेदाराला ग्रामस्थांना त्रास द्यायचा असल्यामुळे तो हे काम अर्धवट ठेवून गेला आहे. त्याने काम तातडीने सुरू न केल्यास त्याचे राजकिय पक्षाशी असलेले साटेलोटे बाहेर काढायला आम्हाला वेळ लागणार नाही. येत्या १५ ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण न केल्यास राणे स्टाईल दाखवत १५ ऑगस्टला याठिकाणी रास्तारोको करण्याचा इशारा मंदार लुडबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे. यावेळी भाई मांजरेकर, रामा चोपडेकर, कान्हा माडये, प्रकाश डिचवलकर आदी उपस्थित होते.
रांजेश्वर पुलानजिकचे जोडरस्ते पूर्ण करा
तारकर्ली मधील रांजेश्वर पुलाकडील जोडरस्ते देखील ठेकेदाराने अपूर्ण ठेवले आहेत. हे काम देखील तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी मंदार लुडबे यांनी दिली आहे.