संतोष परब हल्ला प्रकरण : सिंधुदुर्ग पोलीसांच्या चुकीच्या वर्तनावर लोकायुक्तांकडून ताशेरे
पोलीस अधीक्षकांना सत्तेच्या दबावाखाली न येता निःपक्षपातीपणे काम करण्याच्या सूचना
भाजपा नेते निलेश राणे यांची माहिती ; आ. नितेश राणेंना हेतुपुरस्सर त्रास
सिंधुदुर्ग | कुणाल मांजरेकर
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या तपासावर लोकयुक्तांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना हेतुपुरस्सर त्यांना त्रास दिल्या प्रकरणी भाजपा नेते निलेश राणे यांनी लोकयुक्तांकडे अपील केले होते. त्याची दुसरी सुनावणी आज पार पडली. यावेळी लोकयुक्तांनी पोलीस अधीक्षकांना सत्तेच्या दबावाखाली न येता निःपक्षपातीपणे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबाबतची माहिती निलेश राणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात कुठलेही पुरावे किंवा संबंध नसताना केवळ सत्तेच्या दबावाखाली आमदार नितेश राणे यांना हेतुपुरस्कर त्रास देण्याचा प्रयत्न सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस प्रशासनाकडून झाला. या प्रकरणात भाजपा नेते निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विरोधात लोकयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. आज त्याची दुसरी सुनावणी लोकायुक्तांकडे पार पडली. या सुनावणीत लोकायुक्तांनी सिंधुदुर्ग पोलिसांच्या चुकीच्या वर्तनावर कडक ताशेरे ओढत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षकांना सत्तेच्या दबावाखाली न येता निःपक्षपातीपणे काम करण्याच्या सूचना दिल्या तसेच या प्रकरणात निलेश राणे यांना पुढे दाद मागायची असल्यास त्याच्याही मार्गदर्शन सूचना देणार असल्याची माहिती लोकायुक्त यांनी दिली.