अनधिकृत वाळूप्रश्नी महसूलची कारवाई सुरू ; बाबा परबांनी स्वतःला प्रशासन समजू नये…

सत्तेची नशा डोक्यात गेल्यानेच बाबा परब यांच्याकडून वाळू व्यावसायिकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा प्रयत्न

रस्त्यावर उतरण्याची भाषा सोडा, तो तर शिवसेनेचा जन्मसिद्ध हक्क : बबन शिंदेंचा सूचक इशारा

मालवण | कुणाल मांजरेकर

अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूक प्रकरणी महसूल प्रशासनाकडून संबंधितांवर योग्य ती कारवाई सुरू आहे. असे असताना एकमेव वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या बाबा परब यांनी स्वतःला प्रशासन समजून अनधिकृत वाळूचे डंपर रोखण्याची केलेली मागणी चुकीची असून सत्तेची नशा डोक्यात गेल्याने गोरगरीब वाळू व्यावसायिकांची रोजीरोटी हिरावून घेण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. मात्र त्यांची सत्तेची नशा लवकरच उतरणार असून रस्त्यावर उतरण्याची भाषा कराल, तर शिवसेनाही नेहमीच रस्त्यावर उतरणारी संघटना आहे, हे ध्यानात ठेवा, असा इशारा शिवसेना प्रणित वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांनी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्धीपत्रक देत मालवण तालुक्यातील कर्ली आणि कालावल खाडीपात्रात अनधिकृत वाळू उपसा सुरू असून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर मुळे गणेशोत्सवाच्या तोंडावर गावागावातील रस्ते नादुरुस्त होत असल्याचे म्हटले होते. प्रशासनाने या अनधिकृत वाळू वाहतुकीवर कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरून हे डंपर अडवण्याचा इशारा बाबा परब यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रणित वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन शिंदे यांनी मालवण येथील शिवसेनेच्या शाखेत पत्रकार परिषद घेत बाबा परब यांच्यावर टीका केली. यावेळी अमोल वस्त, प्रशांत भिसळे, बाळू पेडणेकर, सुनील गावकर, संजय कांबळी, पराग खोत आदी वाळू व्यवसायिकांसह शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख यशवंत गावकर, सचिन गिरकर आदी उपस्थित होते.

यावेळी बबन शिंदे म्हणाले, मालवण तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर महसूल विभागाकडून कारवाई सुरूच आहे. त्यामुळे प्रशासन योग्य पद्धतीने आपले काम करत असताना बाबा परब यांनी स्वतःला प्रशासन समजू नये. यापूर्वी कोणाचे वाळूचे धंदे होते, आणि आता आहेत, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या पोटावर पाय देऊ नका. वाळूच्या डंपरमुळे रस्ते खराब होत असल्याचा साक्षात्कार यावर्षी अचानक बाबा परब यांना का झाला ? ते स्वतःला एकट्याला वाळू व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष समजून स्वतःचे निर्णय लादत असतील तर ते निर्णय आम्हाला मान्य नाहीत, रस्त्यावर उतरून वाळू वाहतुकीचे डंपर अडवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र रस्त्यावर उतरण्याचे काम हे शिवसेनेचे आहे तुमचे नाही, आमची सुद्धा उद्या जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी आहे, हे ध्यानात ठेवा. आजपर्यंत गोरगरिबांना न्याय देण्याचे काम शिवसेनेने केले आहे. त्यामुळे तुम्ही काहीही कराल आणि आम्ही गप्प बसणार, हा भ्रम दूर करा. तुमचे संघटनेतील योगदान काय आहे याचाही विचार करा, असा सल्ला बबन शिंदे यांनी दिला. बाबा परब प्रतिनिधित्व करत असलेल्या पक्षाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी किती निधी आणला ते जाहीर करावे, असे सांगून प्रशासनापेक्षा कोणी मोठा नाही. प्रशासन आजही अनधिकृत वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई करत आहे. सत्तेत सहभागी झाल्यामुळे तुम्हाला चढलेली सत्तेची नशा बाजूला करा, तुमच्या सत्तेवर अजूनही कोर्टाकडून टांगती तलवार आहे. त्यामुळे तुमची नशा लवकरच उतरेल, त्यानंतरच्या काळात येथील जनता ही शिवसेनेच्याच पाठीशी उभी राहील, असे सांगताना अनधिकृत वाळू वाहतुकीला शिवसेनेचाही विरोध आहे. मात्र वाळू व्यवसायिकांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचे धंदे करू नका, असे बबन शिंदे म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!