… तर रस्त्यावर उतरून अवैध वाळूचे डंपर अडवणार
वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांचा इशारा
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण तालुक्यातील कालावल, कर्ली नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. मात्र महसूल विभागाचे याठिकाणी सोयीस्कर दुर्लक्ष होत असून अनधिकृत वाळूमुळे रस्त्यांची दुर्दशा होतच आहे, त्याचबरोबर शासन दरबारी महसूल भरून वाळूचे टेंडर घेणाऱ्या अधिकृत वाळू व्यावसायिकांचे देखील यांमुळे नुकसान होत आहे. तरी महसूल विभागाने तातडीने अनधिकृत वाळू उत्खनन आणि वाहतूक रोखावी, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून वाळू वाहतूक करणारे डंपर रोखणार असल्याचा इशारा वाळू व्यावसायिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबा परब यांनी दिला आहे.
कोकणातील महत्वपूर्ण असलेला गणेश चतुर्थीचा सण अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपला आहे. असे असताना गावागावात अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे रस्ते खड्डेमय बनले आहेत. वेळेअभावी रस्ते दुरुस्ती तातडीने होणे शक्य नाही. त्यामुळे निदान गणेश चतुर्थी पर्यंत वाळू वाहतुक करणारे डंपर बंद करावेत. मालवण तालुक्यात सर्वच नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाळू उपसा सुरू असून महसूल विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हे उत्खनन आणि वाहतूक बंद करावी, अन्यथा आम्ही स्वतः रस्त्यावर उतरून ही अनधिकृत वाळू वाहतूक रोखणार आहोत, अशावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असे बाबा परब यांनी म्हटले आहे.