“त्या” बॅग स्वतःसाठी की मातोश्रीसाठी ते स्पष्ट करा …

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणेंचे खा. विनायक राऊत याना आव्हान

मालवण | कुणाल मांजरेकर

राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर आर्थिक विषयावरून केलेल्या आरोपावरून भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी राऊतांना “लक्ष्य” केलं आहे. या माणसाने कोकणचे नाव खराब केले आहे. त्या बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी हे विनायक राऊत यानी स्पष्ट करावे, असे आव्हान निलेश राणेंनी दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरुच आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना मेळाव्यात शिंदे गटातील बंडखोर माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली होती. नाना पटोलेंना घरी जेवायला बोलवून नंतर त्याचे पैसे बंटी पाटलांकडून घेतल्याचे मला समजल्याचे विनायक राऊत म्हणाले होते. या टिकेनंतर राजेश क्षीरसागर यांनीही विनायक राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला. खासदार विनायक राऊत ज्या ठिकाणी जातील, त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम असू दे त्यांची बॅग तयार ठेवावी लागते, असे त्यांनी म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी ट्विट केले आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांनी खासदार विनायक राऊतवर गंभीर आरोप केले, विनायक राऊत निवडणूक असो व कार्यक्रम त्याला ‘बॅग‘ द्याव्या लागतात. कोकणाचं नाव खराब केलं या माणसाने, त्या बॅग स्वतःसाठी होत्या की मातोश्रीसाठी हे विनायक राऊत यानी स्पष्ट करावे, असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!