कोणत्याही क्षणी निवडणूका लागण्याची शक्यता ; गावागावात कामाला लागा
आ. वैभव नाईक यांच्या शिवसैनिकांना सूचना ; मालवणात विभागीय बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
वैभव नाईक यांच्या सारखा निष्ठावंत आमदार लाभला, हे आमचे भाग्यच : शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनेचे काही आमदार अन्यत्र गेले असले तरी शिवसैनिक शिवसेना पक्षाशी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. अशीच एकजूट कायम ठेवून येणाऱ्या निवडणूकीत शिवसेनेचा भगवा फडकावून आपली ताकद दाखवून द्या, असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील आयोजित विभागीय बैठकांमध्ये बोलताना केले. निवडणूका केव्हाही लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच कामाला लागा. गावागावात जाऊन जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करा. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर द्या, असे आवाहनही आ. नाईक यांनी केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख, आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यात आजपासून शिवसेनेच्या विभागीय बैठकांना सुरुवात झाली आहे. शनिवारी पेंडूर जि.प. मतदारसंघांची बैठक कट्टा येथे, पोईप जि.प. मतदारसंघांची बैठक पोईप ग्रा.प. येथे, व देवबाग जि.प. मतदारसंघांची बैठक नांदरुख व तारकर्ली येथे संपन्न झाली. या बैठकांना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
आलेल्या विविध आमिषांना झुगारून आमदार वैभव नाईक शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ राहिले. वैभव नाईक यांच्यासारखा आमदार आम्हाला मिळाला हे आमचे भाग्य आहे. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांमधून उमटल्या. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. यावेळी आ. वैभव नाईक यांनी शिवसैनिकांशी संवाद साधत शिवसेना पक्ष संघटना वाढीसंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी देखील शिवसैनिकांना यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पोईप येथे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, महिला उपजिल्हा संघटक सेजल परब, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, विभागप्रमुख विजय पालव, उपविभागप्रमुख निलेश पुजारे, विभाग समन्वयक कृष्णा पाटकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम, युवासेना उपतालुका प्रमुख अमित भोगले, आशिष परब, मालवण सरपंच संघटना तालुकाप्रमुख नंदू गावडे, माजी सरपंच शिवराम पंत पालव, वायंगवडे सरपंच आनंद सावंत, वेरली सरपंच आनंदी परब, भाऊ चव्हाण आदी उपस्थित होते. तर पेंडुर येथे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, विभाग प्रमुख अण्णा गुराम, उपविभाग प्रमुख प्रसाद दळवी, उपविभाग प्रमुख पपी सावंत, बाबू टेंबूलकर, दर्शन म्हाडगुत, डॉ. सावंत, महिला विभाग प्रमुख लता खोत, विनोद सावंत, विष्णू लाड उपस्थित होते.
देवबाग विभागातील नांदरुख येथे नांदरुख सरपंच दिनेश चव्हाण, विशाल धुरी, समीर पाटकर, सुहास राणे, कविता चव्हाण, अंजली घाडी, वृंदा चव्हाण, स्नीग्धा चव्हाण, महेश चोपडेकर, रामकृष्ण चव्हाण, विशाल भिसे तर देवबाग विभागातील तारकर्ली येथे माजी नगरसेवक मंदार केणी, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, प्रवीण रेवंडकर, महिला विभाग प्रमुख प्रियांका रेवंडकर, उपविभाग प्रमुख अनिल केळूसकर, विलास वालावलकर, शाखाप्रमुख राजू मेस्त्री, आबा केळूसकर, प्रसाद आडवणकर निलेश पणदूरकर, हरिश्चंद्र केळूसकर, सुजन खोबरेकर, वैष्णवी मेस्त्री, नंदू मेस्त्री, प्रभाकर राजम, सुप्रिया भोवर, सुप्रिया केळूसकर आदी उपस्थित होते.