रस्त्यांचे आयुष्य वाढण्यासाठी डांबरीकरणा ऐवजी सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनवा

भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांची मागणी ; ना. नारायण राणे, निलेश राणेंच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा करणार

मालवण | कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे याठिकाणचे रस्ते अल्पावधीतच खराब होतात. परिणामी वाहनचालक, नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांचे आयुष्य टिकण्यासाठी जिल्ह्यातील पंतप्रधान ग्रामसडक आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसह इतर रस्त्यांचे डांबरीकरणा ऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण होणे आवश्यक असल्याचे मत भाजपाचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी व्यक्त केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी कोसळणाऱ्या पावसाचा आणि अतीवृष्टीचा विचार करता या जिल्ह्यात जे रस्ते केले जातात ते डांबरीकरणा ऐवजी सिमेंट काँक्रीटीकरणने झाले तर दरवर्षी रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांच्या साम्राज्याला आळा बसेल. परिणामी इमर्जन्सी दुरुस्ती होईल. काँक्रेटीकरण खर्च अधिक असला तरी वरचेवर दुरुस्तीच्या नावाखाली पैशाचा होणाऱ्या अतिरिक्त खर्चातूनच बजेट वाढ होते, त्याच खर्चात ही कामे दर्जेदार होतील. ज्या मोठ्या रस्त्यांची डागडुजी ज्या एजन्सीला दिली जाते, त्या ऐवजी ती देखभाल दुरुस्ती ज्या स्वायत्त संस्थेच्या कार्यक्षेत्रातून जाते, उदा.जर रस्ता ग्रामपंचायत क्षेत्रातून जात असेल तर त्याची डागडुजी त्याच्याजवळ पैशाच्या तरतुदी सहित देण्यात यावी. आणि असे झाले तर कोकणात वारंवार निर्माण होणाऱ्या खड्ड्यांच्या समस्येला जनतेला जे तोंड द्यावे लागते, त्यातून सुटका होऊ शकते. तसेच पावसाळ्यात डांबरीकरण करता येणार नाही, तसे होणार नाही अशी अनेक कारणे कालबाह्य होतील. हा विषय पॉलीसी मॅटर असल्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्फत राज्य आणि केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार असल्याची माहिती धोंडू चिंदरकर यांनी दिली आहे. विषयासाठी सर्वपक्षीयांनी, स्वायत्त संस्थानी, सामाजिक संस्थानी सहकार्य करण्याचे आवाहनही श्री. चिंदरकर यांनी केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!