वैभव नाईकांच्या दौऱ्यानंतर गटार खोदाई प्रश्नी नगरपालिका “ॲक्शन” मोडमध्ये …!

मुख्याधिकाऱ्यांची कार्यतत्परता ; माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी मानले आभार

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह गटार खोदाईची पाहणी

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण शहरातील गटार खोदाई प्रश्नी आमदार वैभव नाईक यांनी मागील आठवड्यात मालवणात येऊन आक्रमक भूमिका घेतल्यानंतर नगरपालिका “ॲक्शन” मोडमध्ये आली आहे. नाशिकच्या ठेकेदाराकडून सदरील काम वेळेत होत नसल्याने या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्याची सूचना आ. वैभव नाईक यांनी केली आहे. तर मुख्याधिकाऱ्यांनी पालिकेमार्फत कामगारांच्या चार टीम बनवल्या असून संपूर्ण शहरात गटार खोदाईचे उर्वरित काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी मुख्याधिकारी जातिनिशी लक्ष ठेवून असल्याची प्रतिक्रिया माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी देत मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे. दरम्यान, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यासह श्री. खोत यांनी शहरातील गटार खोदाईचा आढावा घेतला.

मालवण शहरातील गटार खोदाईचा ठेका नाशिक येथील ठेकेदाराला देण्यात आला होता. मात्र या ठेकेदाराकडून नियोजित वेळेत गटारांची खोदाई न झाल्याने मागील आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसात सर्वत्र पाणीच पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. यावेळी संबंधित ठेकेदाराचा सुपरवायझर देखील अनुपस्थित होता. यामुळे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांनी रस्त्यावर उतरून पाण्याचा निचरा होण्यासाठी पुढाकार घेतला. याची माहिती आमदार वैभव नाईक यांना दिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी शहराचा तातडीने दौरा करीत संबंधित ठेकेदाराला सर्वांसमक्ष फैलावर घेतले. यावेळी या ठेकेदाराचा ठेका रद्द करून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याची सूचना मुख्याधिकाऱ्यांना केली. यानंतर मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी गटार खोदाईच्या विषयात स्वतः जातीनिशी लक्ष देत कामगारांच्या स्वतंत्र चार टीम बनवल्या आहेत. या टीम मार्फत शहरात उर्वरित भागात गटार खोदाईची कामे वेगाने सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळेच अलीकडे होणाऱ्या पावसात शहरात फारशा प्रमाणात पावसाचे पाणी साठण्याचे प्रकार घडले नाहीत. या कामावर मुख्याधिकारी जातीनिशी लक्ष देत असल्याचे सांगत यतीन खोत यांनी त्यांच्या कार्यतत्परतेचे कौतुक केले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3605

Leave a Reply

error: Content is protected !!