मालवणची “तुंबई” झाली तेव्हा आ. वैभव नाईक मातोश्रीवर “मी निष्ठावंत” ची जपमाळ करण्यात मग्न ; मनसेची टीका
बंदर जेटीवरील १२ पुतळ्यांची संकल्पना मुख्याधिकाऱ्यांची ; वैभव नाईकांनी शहरातील अर्धवट कामांचे श्रेय घ्यावे
मालवण | कुणाल मांजरेकर
जिल्हा नियोजन मधून सर्वच आमदारांना मागणी केल्यास निधी मंजुर केला जातो. मात्र मालवण शहरात आलेला निधी खर्च करण्यासाठी आपल्या बुद्धीचा उपयोग मुख्याधिकाऱ्यांनी केला. वैभव नाईक गेली सात वर्षे सत्तेत होते, पण मालवण नगरपालिकेच्या एकाही प्रकल्पासाठी मोठा निधी आणू शकले नाही. फक्त मंत्र्यांच्या दालनात फोटोशुट करण्यात ते मग्न होते. मालवण शहराची तुंबई झाली त्यावेळी मातोश्रीवर ‘मी निष्ठावानचा’ जपमाळ आमदार करत होते, अशी टीका मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केली आहे. मालवण बंदर जेटीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ मावळ्यांची संकल्पना मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचीच असून आमदार वैभव नाईक त्याचे श्रेय घेऊ नये. त्यांनी शहरातील अर्धवट असलेल्या कामांचे श्रेय घ्यावे, असा सल्लाही श्री. इब्रामपूरकर यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की, मालवण न. प. चे मुख्याधिकारी हे सध्या प्रशासक आहेत. सहा महिन्यापासून ते ही जबाबदारी पार पाडत आहेत. आपल्या कार्यकाळात प्रशासक म्हणुन दांडी येथे बीच महोत्सव अधिकारी, कर्मऱ्यांना सोबत घेत त्यांनी यशस्वी केला. मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे ओरोस, कुडाळचा अतिरिक्त पदभार आहे. नगरसेवक टक्केवारी घेत असल्याने तसेच बेनामी ठेकेदारी असल्याने कचऱ्याचे टेंडर दुसरी मागणी करून कोणी भरले नाही याची आम.वैभव नाईक यांना माहिती होती. शेवटी समोर पाऊस असल्याने मुख्याधिकाऱ्यांना नाशिकच्या ठेकेदाराला ठेका द्यावा लागला. स्वत:चे अपयश झाकण्यासाठीच वैभव नाईकांकडून मुख्याधिकारी यांना रस्त्यावर त्रास देण्याचे काम करण्यात आले. प्रामाणिक अधिकाऱ्यांना स्वार्थासाठी भर रस्त्यावर आमदारांनी झापणे जिल्ह्याची संस्कृती नाही. एकीकडे महोत्सवाचे नियोजन केल्याबद्दल मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक करायचे आणि दुसरीकडे शहरात पाणी तुंबल्याने अंगाशी येताच फैलावर घेण्याचे काम करणे हे चुकीचे आहे.
वैभव नाईक भुयारी गटारचा प्रश्न मार्गी लावू शकले नाहीत. कचऱ्यापासून वीजनिर्मिती पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत. आडारी डम्पिंग ग्राउंडचे दुषित पाणी रस्त्यावर येते. शहराला २४ तास वीज मिळणार अश्या बाता मारून देऊळवाड्यातील वीज उपकेंद्राचे उद्घाटन केले. आज नागरिक सतत वीज खंडित होण्याने त्रस्त आहेत. शहरातील अनेक पथदिवे बंद आहेत. तिलारीचे पाणी मालवण शहराबरोबरच देवबाग- तारकर्लीला नेणार अशी घोषणा केली. त्याचे पुढे काय झाले? पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून भुमिगत वीज वाहिन्यांचे पुढे काय झाले ते त्यांनी जनतेला सांगावे, असेही अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.