दीपक केसरकर कशाला उड्या मारताय, मर्यादेत रहा !
इज्जत मिळतेय तर घ्यायला शिका ; भाजपा नेते निलेश राणे यांचा इशारा
कुणाल मांजरेकर
मालवण : सावंतवाडीत येऊन नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांना सल्ले देणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांचा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. दीपक केसरकर मर्यादेत रहा. कशाला उड्या मारताय, तुमची मतदार संघातील अवस्था काय आहे ते आम्हाला माहिती नाही का ? तुम्हाला कुबड्या मिळाल्या आहेत, त्या कुबड्यांवर तरी चला. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका. नायतर आम्ही गप्प बसणार नाही. ज्या भाषेत तुम्ही सांगाल, त्या भाषेत उत्तर द्यायची आमची तयारी आहे, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
याप्रकरणी निलेश राणे यांनी म्हटले आहे की, दीपक केसरकर आपण युतीत आहोत हे विसरू नका. युती टिकायची जबाबदारी जशी आमची आहे, तशी तुमचीही आहे. तुम्ही शिंदे गटाचे प्रवक्ते असू शकता, आमचे नाही. तुमची अवस्था आम्ही मतदार संघात काय केली आहे, ते आम्हाला माहिती आहे. राणेंच्या याच दोन मुलांनी तुमची नगरपालिका तुमच्याकडून घेतली. त्याठिकाणी भाजपा आहे. तुमच्या मतदार संघातील पंचायत समिती सदस्य आमच्याकडे आहेत. अनेक ग्रामपंचायती आमच्याकडे आहेत. त्यामुळे तुमची लायकी आम्हाला चांगली माहिती आहे. मतदार संघातून तुमचा विषय आटोपला होता. राज्यातील घडामोडींमध्ये तुम्हाला दुसरं राजकिय जीवनदान मिळालं आहे. हे विसरू नका. इज्जत मिळतेय तर इज्जत घ्यायला शिका. नायतर आम्ही गप्प बसणार नाही, ज्या भाषेत तुम्ही सांगाल, त्या भाषेत उत्तर द्यायची आमची तयारी आहे. वातावरण खराब करू नका, जबाबदारी आपल्या दोघांवर आहे. मीडिया समोर तुम्ही नवीन नवीन बोलायला लागला आहात, पण तुम्हाला अजून ते जमत नाही. ते शिकून घ्या. कोणाला काय बोलायचं, कुठे बोलायचं ते जरा विचारून घ्या. मगच तोंड उघडा, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.