आमच्या नगरसेवकांपेक्षा जास्त निधी भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डात खर्च : महेश कांदळगावकर

आकडेवारी कागदपत्रांसह सिद्ध करण्यास तयार ; सुदेश आचरेकर दीड महिना गटार खोदाईवर गप्प का ?

शिवसेनेवर बोलताना सबुरी बाळगा, राजकीय परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही

मालवण | कुणाल मांजरेकर

मालवण नगरपालिकेच्या पाच वर्षांच्या सत्ताकाळात भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डात कामे झाली नाहीत, हा आरोप धादांत चुकीचा आहे. त्याउलट मागील पाच वर्षात शिवसेनेपेक्षाही भाजपा नगरसेवकांच्या वॉर्डात विकास निधी खर्च करण्यात आला आहे. आवश्यकता असेल तर याचे कागदोपत्री पुरावे देण्यास आम्ही तयार आहोत, असे प्रत्युत्तर माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिले आहे. शिवसेनेवर आरोप करताना भाजपाच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे, राजकिय परिस्थिती बदलायला वेळ लागणार नाही, असे सूचक वक्तव्यही श्री. कांदळगावकर यांनी केले आहे.

शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. कांदळगावकर म्हणाले, मालवण शहरातील रस्ते पाण्याखाली गेल्यानंतर मी आणि यतीन खोत स्वतः पाण्याला वाट करून देण्यासाठी रस्त्यावर उतरलो, तेव्हा आमदार वैभव नाईक यांना आम्ही मालवणात पाचारण केले. आज सुदेश आचरेकर गटार खोदाईवर आवाज उठवत आहेत. पण हेच आचरेकर दीड महिने गटार खोदाईवर गप्प का होते, याची माहिती माजी खासदार निलेश राणे यांनी करून घ्यावी. आमच्या सत्ताकाळात कामगारांना कमी पगार देणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमच्या कालावधीत जनतेची कामे कश्या प्रकारे होत होती, ते सुदेश आचरेकर यांनी माझ्या केबिनमध्ये बसून अनेकदा अनुभवले आहे. केवळ आता नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे आरोप – प्रत्यारोपाचे काम सुरू असल्याचे ते म्हणाले. आमदारांवर ३५३ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यापूर्वी हा गुन्हा कधी दाखल करतात, याची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांनी जाणून घ्यावी. एखादे काम चुकीच्या पद्धतीने सुरू असेल तर ते रोखण्याचा हक्क जागृत लोकप्रतिनिधीला आहे, असेही ते म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!