खूप शिका… मोठे व्हा… पंतप्रधान मोदींच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत बनवण्यासाठी तुमची साथ आवश्यक !
केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विद्यार्थ्यांना गुरुमंत्र ; निलेश राणेंच्या माध्यमातून बारावीच्या गुणवंत मुलांना टॅब वितरण
नुसतं टॅब देऊन आमची जबाबदारी संपणार नाही. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेईपर्यंत आमचा लढा सुरू : निलेश राणे
मालवण | कुणाल मांजरेकर
कसं जगावं हे शिकवणारा विषय म्हणजे शिक्षण होय. शिक्षण हा सर्वाचा पाया आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत, महासत्ता भारत बनविण्यासाठी प्रत्येक भारतीयांचे योगदान महत्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खूप शिकून मोठं व्हावं. शैक्षणिक प्रगतीतून उत्तुंग यश प्राप्त करावं. आयएएस, आयपीएस अश्या उच्च पदाबरोबरच व्यवसाय, उद्योगातही उज्वल यश संपादन करावे. माझ्याहस्ते सत्कार झालेला कोणी विद्यार्थी उद्या आयएएसज आयपीएस बनून समोर येईल, तो दिवस माझ्यासाठी सर्वोच्च असेल, असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री ना. नारायण राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.
भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण शहरातील बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा केंद्रियमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते टॅब देऊन मालवण येथील निलरत्न निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी २४ गुणवंत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले. यावेळी भाजप माजी खासदार निलेश राणे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, गणेश कुशे, संतोष साटविलकर, दीपक नारकर, अभि गावडे, भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, तालुकाध्यक्ष विक्रांत नाईक, महिला शहर अध्यक्ष चारुशीला आचरेकर, ममता वराडकर, मोहन वराडकर, पूजा सरकारे, पूजा वेरलकर, नमिता गावकर, आबा हडकर, राजू बिडये, सूर्यकांत फणसेकर, विलास मुणगेकर, संतोष गावकर, पंकज पेडणेकर, सुमित सावंत, भाई मांजरेकर, अरविंद सावंत, शेखर राणे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ना. राणे पुढे म्हणाले, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जिद्दीने त्याचा पाठलाग केला पाहिजे. शैक्षणिक प्रगती आपल्याला यशाच्या शिखरावर पोहचवते. जगात अशक्य असे काहीच नाही. माझा कोकणी माणूस उच्च पदावर पोहोचला पाहिजे. त्यासोबतच प्रत्येकाने साधू संतांचे विचार आत्मसात केले पाहिजे. हे स्पर्धेचे, आधुनिकतेचे युग आहे. मात्र यशाच्या अनेक संधी शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. उद्योग व्यवसायाची दारे खुली आहेत. उद्योग, व्यवसाय उभारा. कर्ज, अनुदान या सर्व सुविधांचा वापर करा. युवतींनी पुढे येऊन नेतृत्व करावे. सुसंस्कृतपणा व माणुसकी जपत सर्वांनी शैक्षणिक प्रगतीतून श्रीमंत व्हावे असा मौलिक सल्ला मंत्री नारायण राणे यांनी दिला.
तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेईपर्यंत माझा लढा सुरू : निलेश राणे
यावेळी निलेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील मुलांच्या शिक्षणाबाबत अनेक अडचणी आहेत. या व्यथा थेट राणेसाहेबां पर्यंत पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या उपस्थितीत हा टॅब वितरणचा कार्यक्रम होत आहे. राणेसाहेबानी आजवर अनेक गुणवंत मुलांना टॅब, लॅपटॉप दिले, अनेकांना शिक्षणासाठी आर्थिक मदतही केली. पण त्या मुलांचे पुढे काय झाले, हे समजले नाही. आपली मुलं थेअरी मध्ये मागे पडत नाहीत, पण प्रॅक्टिकल मध्ये कमी पडतात, त्या मुलांना संधी मिळाली पाहिजे. यासाठी कुडाळ मध्ये आम्ही स्किल डेव्हलपमेंट अकादमी सुरू करीत आहोत, असे सांगून सिंधुदुर्गातील मुलांना उच्च शिक्षणासाठी अनेक संधी मिळाव्यात. येथील मुले उच्च शिक्षणातून उच्च पदावर पोहचावी यासाठी आम्ही नेहमीच सोबत आहोत. मिशन करिअरच्या माध्यमातून शैक्षणिक प्रगतीची नवी दालने खुली केली जातील, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवावा आणि यश प्राप्त करावे. आमच्या घरातच राणेसाहेब ही युनिव्हर्सिटी होती. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही पुढे गेलो. देशातील एकही असे सभागृह नाही, जे राणेसाहेबांनी बघितले नाही. त्यांचा आदर्श अनेकांनी घेतला. त्यासोबतच आपल्या मातीशी आपण जोडले राहावे. नुसतं टॅब देऊन आमची जबाबदारी संपणार नाही. तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेईपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील, असे निलेश राणे म्हणाले. यावेळी विजय केनवडेकर यांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत मंत्री नारायण राणे यांचा प्रेरणादायी राजकीय प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. विजय केनवडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार मानले.