भाजयुमोच्या इशाऱ्यानंतर मालवण नगरपालिका प्रशासन तातडीने लागलं कामाला !

आज भाजयुमोने आवाज उठवला म्हणून कचरा उचलला, उद्याचं काय ?

नगरपालिका प्रशासनाच्या “सांगकाम्या” भूमिकेबाबत उपस्थित होतोय सवाल

कुणाल मांजरेकर

मालवण : नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे शहरातील रेवतळे सागरी महामार्ग डम्पिंग ग्राउंड बनल्याची नाराजी मालवण शहर भारतीय जनता युवा मोर्चाने व्यक्त करताच नगरपालिका प्रशासन तातडीने कामाला लागलं आहे. दुपारी नगरपालिकेच्या कचरा गाडीने तात्काळ याठिकाणी येऊन येथील कचरा जमा केला. त्यामुळे येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, रेवतळे येथील कचरा अनेक दिवस तसाच पडून होता. आज भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत आवाज उठवून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर नगरपालिकेला जाग आली आणि दुपारी येथील कचरा उचलला गेला. मात्र प्रत्येकवेळी आंदोलनाचे इशारे दिल्यावरच पालिकेला जाग येणार का ? असा सवाल देखील यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

मालवण शहरातील रेवतळे येथील सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याने येथे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत भाजयुमोचे शहराध्यक्ष ललित चव्हाण यांच्यासह भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी आवाज उठवून येथील कचरा न हटवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे दुपारी तातडीने पालिकेची कचरा गाडी पाठवून येथील कचरा उचलण्यात आला. काही दिवसांपूर्वी याच भागातील कचऱ्या बाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती. त्यावेळी पालिकेच्या कारभारावर नेटकऱ्यांनी टीकास्त्र सोडताच येथील कचरा उचलण्यात आला. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट करणे किंवा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच पालिकेला जाग येणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मालवण शहरात अनेक ठिकाणी आज कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात. बहुदा त्याठिकाणचे नागरिक सोशल मीडियावर त्याचे फोटो प्रसिद्ध करत नसल्याने हा कचरा उचलला जात नाही का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरातील कचऱ्या बाबत समस्या सोडवण्यासाठी पालिकेने व्हाट्सएप नंबर जाहीर केला आहे. मात्र या नंबरवर तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे मालवण नगरपालिकेने स्वतःच्या कारभारात सुधारणा करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!