आ. नितेश राणे रमले भातशेतीत !
मूळ गाव वरवडेत पारंपरिक पद्धतीने केली भातशेती
कणकवली : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी आपल्या वरवडे गावातील शेतीमध्ये भातशेती केली. बैलांचे औत धरून पारंपरिक पद्धतीने त्यांनी भातशेती केली.
आमदार नितेश राणे यांनी वरवडे गावातील आपल्या शेतीत सकाळपासूनच नांगरणीस सुरुवात केली. बैलांना नांगर जुंपून जमिनीची उखळ घातली. त्यानंतर भात लावणी करण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत गावातील शेतकरी आणि भात लावणी करण्यासाठी महिला भगिनी मदतीला होत्या. कोकणात भात लावणीचा हंगाम असून समाधानकारक पडणाऱ्या पावसात सर्वच शेतकरी भाताची लावणी करताना दिसतात आमदार नितेश राणे यांचे वरवडे हे गाव असून त्या ठिकाणी त्यांच्या शेतीत भात लावणीचे काम सुरू आहे. याच दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. भात लावणीचे काम सुरू असल्याने सकाळी नऊ वाजता वरवडे येथील शेतात ते गेले आणि शेतीच्या कामात हातभार लावला. शेतीच्या बांधावर बसून त्यांनी न्याहारी सुद्धा केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, पंचायत समिती माजी सभापती प्रकाश सावंत, भाजपा उपाध्यक्ष सोनू सावंत, महेश गुरव, आनंद घाडी, सुभाष मालंडकर, अशोक घाडी, दीपक घाडी, रामा निर्गुण, प्रकाश घाडी, सत्यवान निर्गुण, गणेश परब, सुरेश घाडी आदीसह गावातील शेतकरी उपस्थित होते.