बा देवा म्हाराजाSSS… नितेश राणेंका जिल्ह्याचा पालकमंत्री पद मिळांदे… !
कांदळगाव ग्रामस्थांचे रामेश्वर चरणी साकडे ; आ. राणेंनी घेतले कुलदेवता रामेश्वराचे दर्शन
कुणाल मांजरेकर
मालवण : राज्यात सत्ताबदल होऊन भाजपचं सरकार सत्तेत आलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते आमदार नितेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरास भेट देऊन श्री रामेश्वराचे आशीर्वाद घेतले. यावेळी जिल्ह्याच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आ. नितेश राणे यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विराजमान होऊ देत, असं साकडं ग्रामस्थांनी श्री देव रामेश्वराच्या चरणी घातलं.
आ. नितेश राणे यांनी बुधवारी सायंकाळी राणे कुटुंबीयांची कुलदेवता श्री देव रामेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी माजी सभापती उदय परब, भाई मांजरेकर यांच्यासह सोसायटी संचालक आबा साळकर, भरत परब, सत्यवान परब, प्रमोद साळकर, गुंजन सुर्वे, ओंकार परब, राजन पावसकर, रमेश कांदळगावकर, श्यामसुंदर मुळये, मनोज आचरेकर, बापू गुरव, प्रसाद भोगले यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. कांदळगाव येथील कु. जयेश परब याने दहावीत ८४ % गुण प्राप्त केल्याबद्दल त्याचा आ. नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.