ते’ अश्रू अंगार बनून प्रत्येक शिवसैनिक गावागावात- वाडीवाडीत शिवसेना जोमाने वाढवण्याचे काम करेल…
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला विश्वास
मालवण तालुका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम असल्याचे केले स्पष्ट
कुणाल मांजरेकर
मालवण : गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला व शिवसैनिकांना अभिमान वाटावा असे कार्य केले. संकटकाळात शिवसेना हा महाराष्ट्राचा आधार राहिली. कोरोना काळात मुख्यमंत्र्यांनी केलेले कार्य, घेतलेले निर्णय हे जनता कधीही विसरू शकणार नाही. सर्व जनतेला सुविधा देण्याचे काम महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे सरकारने केले. फक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर महाराष्ट्राचा आधारवड म्हणून ते बनले. मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या कार्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. राजीनामा देऊन ते मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपासून बाजूला झाले तरी या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिकांच्या डोळ्यातून आलेले अश्रू अंगार म्हणून साठवून प्रत्येक शिवसैनिक गावागावात आणि वाडीवाडीत शिवसेना जोमाने वाढवण्याचे काम करेल. आपणही शिवसेना अधिक भक्कमपणे उभी करण्याचे काम करू. पक्षाने जबाबदारी दिल्यास इतर जिल्ह्यात जाऊन पक्ष वाढवू, अशी ग्वाही शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी मालवण शाखेत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यासह जिल्ह्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा आढावा घेतला. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहर प्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख राजु परब, गौरव वेर्लेकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेंद्र म्हाडगुत, बंड्या सरमळकर,भाई कासवकर, युवा सेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, महेश जावकर, सचिन गिरकर, दादु शिर्सेकर, उमेश मांजरेकर, दीपक देसाई, दत्ता पोईपकर आदी उपस्थित होते.
खोबरेकर म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तसेच वर्षा निवासस्थानातून निघताना प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून अश्रू आले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काही सत्तापिपासू लोक महाराष्ट्राच्या सत्तेपासून दूर राहिले हे चांगलेच झाले.
सिंधुदुर्ग, कोकणातील शेतकरी, बागायतदार मच्छीमार यांना मुख्यमंत्री पदाच्या काळात उद्धव ठाकरे यांनी तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करून मदत निधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. अडीच वर्षाच्या काळात जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज, वेळागर येथे ताज हॉटेल, शेतकऱ्यांना कर्जमाफी, मच्छिमारांना अनुदान दिले. यासह चिपी विमानतळ, बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्याचे काम आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यातून झाले. देवबागला बंधारा दिला. आम्हाला अभिमान वाटेल असे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून घडले. त्यामुळेच आज महाराष्ट्रातील वारकऱ्यांनीही उद्धव ठाकरेंच्या हस्ते पूजा व्हावी, असे मत व्यक्त केले होते, असे हरी खोबरेकर म्हणाले.
मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचाच झेंडा : मंदार केणी
उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत मालवण नगर पालिकेसाठी न भूतो न भविष्यती अशा प्रमाणात निधी उपलब्ध झाला. मागील १५-१५ वर्षे प्रलंबित असलेले अनेक रस्ते मार्गी लागले. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात मालवण शहरासाठी १० कोटींपेक्षा जास्त निधी आणण्यात आमदार वैभव नाईक हे यशस्वी झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार वैभव नाईक यांच्या कुशल नेतृत्वाखाली आगामी नगरपालिका निवडणुकीत मालवण नगर परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वास माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी यावेळी व्यक्त केला.