धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावीच लागते !
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रतिक्रिया ; देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा
कुणाल मांजरेकर
राज्यात घडलेल्या राजकीय नाट्यात ऐनवेळी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा होऊन मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिले. या संपूर्ण घडामोडीत देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा राजकीय गोटात व्यक्त केली जात असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका पत्राद्वारे देवेंद्र फडणवीस यांना आगामी वाटचालीसाठी मनसे शुभेच्छा दिल्या आहेत. ही बढती आहे की अवनीती ह्यात मी जात नाही. आणि कुणी जाऊ ही नये. पण एक सांगतो की आयुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा असेल तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही. तुम्हाला यापुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे, असे राज ठाकरेंनी या पत्रात म्हटले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बंडाचे निशाण रोवल्यानंतर शिवसेनेतील ३९ आमदारांसह ५० आमदारांनी त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे सहाजिकच राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा ठाम विश्वास व्यक्त केला जात असतानाच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची संधी देत देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करावे, असे निर्देश दिले. यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देत देवेंद्र फडणवीस यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
“प्रिय देवेंद्रजी, सर्वप्रथम महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री म्हणून आपण जबाबदारी स्विकारल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन. वाटलं होतं की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचं नव्हतं. असो… तुम्ही ह्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सलग पाच वर्ष काम केलेत. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतकं असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून, पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतलीत. पक्ष, पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं. पक्षाशी बांधीलकी म्हणजे काय असतं, त्याचा हा वस्तुपाठच आहे. ही गोष्ट देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरुपी लक्षात ठेवण्यासारखी आहे. खरोखरच अभिनंदन!
आता जरा आपल्यासाठी…. ही बढती आहे की अवनती ह्यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये. पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला ह्या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. एक निश्चित की तुम्ही तुमचं कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलंच आहे, त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना.
पुन्हा एकदा तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.