राज्य सरकारला अल्पमतात ; तात्काळ बहुमत चाचणी घ्या
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाची राज्यपालांकडे मागणी
राज्यपालांकडून अद्याप कोणताही निर्णय नाही ; “ती” चर्चा ठरली अफवा
कुणाल मांजरेकर
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर भारतीय जनता पक्ष ॲक्शन मोडमध्ये आला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची भेट घेतली. यावेळी शिवसेनेच्या ३९ आमदारांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढल्याने सरकार अल्पमतात आले असून तात्काळ बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या मागणीवर राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. राज्य सरकारला गुरुवारी ३० जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश राज्यपालांनी दिल्याचे वृत्त अनेक वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आले. मात्र ही तारीख अफवा असल्याचे सिद्ध झाले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल्यानंतर भाजपाने उघडपणे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फ़त बैठकांचा सिलसिला सुरू होता. मंगळवारी फडणवीस दिवसभर दिल्लीत होते. याठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठांच्या त्यांनी भेटीगाठी घेतल्या. नंतर मंगळवारी सायंकाळी उशिरा ते मुंबईत दाखल झाले. यानंतर रात्री फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन राज्य सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावण्याची मागणी केली आहे. या शिष्टमंडळात चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, गिरीश महाजन आदी उपस्थित होते.