शिवसेनेतील गळती थांबेना, उदय सामंत गुवाहाटीला रवाना ; फोटो व्हायरल
ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे तब्बल आठ मंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात
कुणाल मांजरेकर
शिवसेना आमदारांच्या बंडखोरीमुळे पक्ष संघटना सावरण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले असताना दुसरीकडे मात्र शिवसेनेला लागलेली गळती काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाहीय. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील गुवाहाटीला रवाना झाले आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेल्या बंडखोरांच्या गटात सामील झालेले उदय सामंत हे शिवसेनेचे आठवे मंत्री आहेत. त्यांचे विमानतळावरील फोटोही व्हायरल झाले आहेत.
आमदारांना मिळणाऱ्या निधीपासून हिंदुत्वाच्या विचारधारेपर्यंत विविध कारणे देत शिवसेनेच्या तब्बल ४० आमदारांनी पक्षनेतृत्वाविरोधात बंड केलं आहे. हे सर्व बंडखोर आमदार आधी सूरत आणि त्यानंतर आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपसोबत युती करावी, अशी या आमदारांची मागणी आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर शिवसेनेच्या उर्वरित नेत्यांसह रस्त्यावर उतरत या बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आपला रोष व्यक्त करत आहेत. मुंबईसह राज्याच्या विविध भागात शिवसेनेकडून मेळावेही घेतले जात आहेत. सिंधुदुर्गात देखील शिवसैनिकांकडून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदार वैभव नाईक यांचे सत्कार सोहळे घडवून आणले जात असताना दुसरीकडे पक्षातील गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नसल्याची स्थिती आहे. उदय सामंत यांच्या रूपाने बंडखोर आमदारांच्या गटात वाढ झाली आहे. शिवसेनेतील नाराज आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गायब झाल्यानंतरही उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत होते. दोन-तीन दिवसांपूर्वी उदय सामंत हे एकदाच शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा होती मात्र याच वेळी उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन ही चर्चा फेटाळून लावली अलीवारपासून बंडखोरा विरोधात शिवसेना आक्रमक झाली असताना रविवारी अचानक उदय सामंत हे नॉटरीचेबल असल्याचे वृत्त सिंधुदुर्गात येऊन अडकले त्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्यासाठी होणार असल्याची चर्चा सुरू झाली या पार्श्वभूमीवर विमानतळावरील यांचे फोटो व्हायरल झाल्याने या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.