आमची निष्ठा “मातोश्री, बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांच्या” पाठीशी !
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शिवसैनिकांची प्रतिक्रिया ; वैभव नाईकांसारखा आमदार लाभला हे भाग्यच
वैभव नाईकांचे एकनाथ शिंदेंशी घनिष्ट संबंध, पण … ; तालुकाप्रमुखांचा शिवसैनिकांना “मोलाचा” सल्ला
कुणाल मांजरेकर : मालवण
जन्माला आल्यावर लहानपणीच छातीवर “धनुष्यबाण” लावून आम्ही शिवसैनिक झालो. शिवसेना, स्व. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मातोश्री हेच आम्हाला माहीत आहे. राज्यातील सध्याच्या घडामोडीत कोणीही शिवसेना सोडून कुठेही गेलेत तरी मातोश्री, बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांवर आमचे प्रेम अबाधित आहे. शिवसेनेच्या सत्ताकाळात शिवसेनेच्या शाखेत जेवढी लोकं येत नव्हती, त्यापेक्षाही अधिक शिवसैनिक आज शिवसेनेच्या संकट काळात शाखेत उपस्थिती लावत आहेत. त्यातून शिवसैनिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेवरील प्रेम दिसून असल्याची प्रतिक्रिया तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पक्षाने ज्यांना मंत्रीपदांसह मोठमोठी पदे दिली, असे अनेक आमदार आज गद्दारी करून पक्ष सोडून जात असताना आमदार वैभव नाईक शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. वास्तविक नारायण राणे यांचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विधानसभेत प्रवेश करणाऱ्या वैभव नाईकांना मंत्रीपद मिळेल, अशी आम्हा शिवसैनिकांना अपेक्षा होती. मात्र मंत्रीपद न मिळूनही वैभव नाईक यांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाना बळी न पडता शिवसेनेच्या भगव्याशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला. असा आमदार लाभला, हे आमचे भाग्यच समजतो, असेही ते म्हणाले.
येथील शिवसेना शाखेत शनिवारी सकाळी हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेश जावकर, आकांक्षा शिरपुटे, शीला गिरकर, भाई कासवकर, युवासेना शहर प्रमुख मंदार ओरसकर, नंदू गवंडी, महिला उपसंघटक सेजल परब, महिला समन्वयक पुनम चव्हाण, प्रवीण लुडबे, आतु फर्नांडिस, नीनाक्षी शिंदे, सन्मेष परब, गौरव वेर्लेकर, बाळू नाटेकर, उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, सोमनाथ लांबोर, दीपक देसाई, पॉली गिरकर, भगवान लुडबे, जयू लुडबे, दिलीप घारे, सुहास वालावलकर, लक्ष्मी पेडणेकर, नंदा सारंग, अंजना सामंत, पुजा तळाशीलकर, प्रसाद आडवणकर, अक्षय भोसले राजन लुडबे, मनोज लुडबे, सौ. वायंगणकर, अक्षय सातार्डेकर, सुरेश मडये, दत्ता पोईपकर, प्रिया धुरी, कांचन तारी, बंड्या सरमळकर, स्वप्निल आचरेकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
वैभव नाईकांचे एकनाथ शिंदेंशी घनिष्ट संबंध, पण …
एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे बलाढ्य नेते होते. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांचे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर जेव्हा पक्ष निष्ठेचा विषय आला, त्यावेळी वैभव नाईक यांनी आपले व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवून मातोश्रीशी निष्ठा दाखवली. त्यांचा हा गुण प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आत्मसात करणे आवश्यक आहे. उद्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये आपला कितीही जवळचा मित्र विरोधी पक्षातून निवडणूक रिंगणात असला तरी शिवसेनेच्या भगव्याशी एकनिष्ठ राहून प्रत्येकाने या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला शंभर टक्के यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन हरी खोबरेकर यांनी केले.
यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, शिवसेनेचे आमदार कुठेही गेले तरीही शिवसेनेचा कार्यकर्ता आणि मतदार पक्षनेतृत्वाशी प्रामाणिक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोणीही गेले तरी संघटनेवर त्यांचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहेत. या कठीण प्रसंगात आमदार वैभव नाईक , पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, यांनी आपली शिवसेनेशी असलेली निष्ठा दाखवून दिली आहे. खासदार विनायक राऊत खंबीरपणे मातोश्रीवर राहून शिवसेनेची भूमिका मांडत असून आज खुद्द नारायण राणे यांच्यासोबत गेलेले कार्यकर्ते देखील शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत, असे हरी खोबरेकर यांनी सांगून मालवण तालुक्यातील शिवसेना एकसंघ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेमुळेच सर्वसामान्य कुटुंबातील अनेक जण मोठमोठ्या पदांवर पोहोचले. माझ्यासारखा मच्छीमार कुटुंबातील सामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा परिषद सदस्य, तालुकाप्रमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य, जिल्हा दक्षता समिती सदस्य यांसारख्या पदांवर पोहोचू शकला, हे केवळ आणि केवळ शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच ! शिवसेना एक कुटुंब असून बाळासाहेबांचे विचार आणि उद्धव साहेबांची दूरदृष्टी यावर आमचा पक्ष उभा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या कठीण प्रसंगात आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहोत, असे हरी खोबरेकर म्हणाले.