“तिच्या” पंखाना बळ देणार ; भाजप पदाधिकाऱ्यांची ग्वाही

प्रतिकूल परिस्थितीत दहावीत उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला आर्थिक मदत

दीपक पाटकर यांच्या संकल्पनेतून उपक्रम ; शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार

कुणाल मांजरेकर : मालवण

कोरोनाच्या काळात सरकारने ऑनलाईन शिक्षण सुरू केलं खरं, पण ग्रामीण भागात खरी समस्या होती मोबाईल नेटवर्कची. मात्र घरची परिस्थिती बेताची असलेल्या कांदळगाव मधील कु. भारती मिलिंद आचरेकर हिने या प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रोझरी इंग्लिश स्कुल मधून दहावीच्या परीक्षेत ९३.२० % गुण प्राप्त केले आहेत. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल मालवण भाजपाच्या वतीने तिचा सत्कार करून तिला आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आला. या मुलीला पुढील शिक्षणासाठी भाजपाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी दिली आहे. श्री. पाटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या मदतीसाठी श्री. पाटकर यांच्यासह अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, विजय केनवडेकर, बाबा परब, राजू बिडये यांनी आर्थिक हातभार लावला.

कांदळगाव येथे रहाणाऱ्या कु. भारती आचरेकर हिची आर्थिक परिस्थिती बेताची असून तिची आई सौ. भक्ती आचरेकर शहरातील माघी गणेश चौकासह अन्य ठिकाणी फुले विक्रीचा व्यवसाय करते. दोन वर्षे कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अभ्यासक्रम ऑनलाइन स्वरूपात घेण्यात आला. मात्र कांदळगाव मध्ये नेटवर्कची समस्या असल्याने कु. भारतीने गावाबाहेर येऊन नेटवर्क मिळत असलेल्या ठिकाणी जात आपला अभ्यास पूर्ण केला. मालवण शहरात आईसोबत फुले विक्रीसाठी येतानाही ज्या भागात नेटवर्क उपलब्ध असेल, त्या ठिकाणी येऊन ती अभ्यास करत होती. अशा प्रतिकूल परिस्थितीशी झगडत तिने दहावीमध्ये ९३.२० टक्के गुण प्राप्त केले. कु. भारती हिला ड्रॉइंगमध्ये उच्चशिक्षण घ्यायचे आहे. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्यासमोर शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला असून सदरील बाब माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यापर्यंत पोहोचताच भाजपच्या माध्यमातून या मुलीला आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यानुसार येथील भाजपा कार्यालयात कु. भारती हिला आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी पुढील शिक्षणासाठी पक्षाच्या वतीने तिला सहकार्य करणार असल्याचे दीपक पाटकर यांनी सांगितले. आगामी काळात भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातूनही कु. भारती हिला शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, गणेश कुशे, राजू बिडये, ललित चव्हाण, प्रमोद करलकर, बाळू मालवणकर, विलास मुणगेकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!