चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार : नितेश राणेंचं ट्विट
संजय राऊत यांच्या विधानसभा बरखास्तीच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया
कुणाल मांजरेकर
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील ठाकरे सरकार संकटात आले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी विधानसभा बरखास्तीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांचे हे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार, असं ट्विट आ. राणेंनी केलं आहे.
राज्याचे ज्येष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून शिवसेनेचे ४० हुन अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याने ठाकरे सरकार संकटात आले आहे. एकनाथ शिंदे यांचा गट भाजपा सोबत मिळून सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी महाराष्ट्रात विधानसभा बरखास्त होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून संजय राऊत यांचे विधान खोडून काढले आहे. “संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय ? सरकार वाचविण्यासाठी? चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !” असं नितेश राणेंनी म्हटलं आहे.