रिक्षा अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुनील मलये यांचा उपचारा दरम्यान मृत्यू
माकड आडवे आल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात झाली होती दुखापत
सुनील मलये यांच्या अपघाती निधनाने कातवडसह मालवण तालुक्यावर शोककळा
मालवण : खैदा ओवळ येथील घाटमार्गावर माकड आडवे आल्याने रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातातील जखमी सुनील नारायण मलये वय (५९, रा. खैदा कातवड) यांचे गोवा बांबूळी येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. सुनील मलये हे मालवण तालुका धान्य, केरोसीन दुकान संघटनेचे अध्यक्ष होते. तसेच कोळंब ग्रामपंचायतीचे सरपंचपद देखील त्यांनी भूषवले होते. सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुनील मलये यांच्या अपघाती निधनाने कातवड गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात १६ जून रोजी घडला होता.
या अपघातात सुनील मलये यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने मालवण ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्राथमिक उपचार करून त्यांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. गेले चार दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, प्रकृती खालावल्याने शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला.
सुनील मलये यांनी कोळंब ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच म्हणून काम केले होते. गावातील धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर होते. मालवण तालुका धान्य, केरोसीन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष म्हणून सध्या कार्यरत होते. मालवण खरेदी विक्री संघाच्या कर्मचाऱ्यांच्या अन्याया विरोधात न्यायालयीन लढा देत कामगारांना यश मिळवून दिले होते. क्रिकेट क्षेत्राची त्यांना फार आवड होती. गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे तसेच प्रत्येक संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे असे ते हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. सुनील मलये याच्या आकस्मिक निधनाने कातवड गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी आडारी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय, पुतण्या, असा परिवार आहे.