“त्या” चोरट्यांकडून शहरात अन्य ठिकाणी रेकी ? “श्वान” बिल्डींगमध्ये घुटमळला
तेजस नेवगी यांच्या घरावर तीन ते साडेतीन लाखांचा डल्ला : दीड लाख रोख रक्कमेसह दागिने लंपास
कुणाल मांजरेकर
मालवण : शहरातील बंद असलेल्या तीन घरांमध्ये घरफोडी करणाऱ्या “त्या” अज्ञात चोरट्यांनी शहरात अन्य काही परिसरात “रेकी” केल्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग पोलिसांच्या “मायलो” या श्वानाकडून पोलिसांनी घटनास्थळी तपासणी केली असता नेवगी यांच्या घराच्या मागील बाजूला असलेल्या “शाळीग्राम” कॉम्प्लेक्स मधील तीन ते चार घरासमोर हा श्वान घुटमळला. त्यानंतर त्याने चोरी झालेल्या उर्वरित दोन घरांचा माग काढला. दरम्यान, तेजस नेवगी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आपल्या घरातील दीड लाख रुपये रोख रक्कमेसह दागिने मिळून तीन ते साडेतीन लाखांचा ऐवज चोरीला गेल्याचे म्हटले आहे.
मालवण शहरामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांकडून धाडसी घरफोडी झाली आहे. शहरातील मेढा, बाजारपेठ परिसरात बंद असलेली तीन घरे चोरट्यांनी फोडली आहेत. दरम्यान, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही चोरी झाल्याची शक्यता असून मेढा परिसरात एका व्यक्तीला पळून जाताना पाहिल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
शहरातील बाजारपेठ येथील तेजस नेवगी, मेढा येथील सुरेंद्र पालव आणि मेढा येथील महेश परब यांच्या घरी ह्या घरफोड्या झाल्या आहेत. सकाळी ही घटना निदर्शनास आली. दरम्यान, पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे. चोरटा माहितगार असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.