मालवण येथील प्रधान डाकघर अन्यत्र हलवण्याचा घाट ; भाजपा आक्रमक
माजी खा. निलेश राणेंच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे लक्ष वेधणार
कार्यालय स्थलांतरित केल्यास तीव्र आंदोलन : आचरेकर, पाटकर, केनवडेकर यांचा इशारा
कुणाल मांजरेकर
मालवण : मालवण येथे स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असलेले प्रधान डाकघर जिल्ह्यात अन्यत्र भाड्याच्या जागेत हलवण्यात येण्याचा घाट घालण्यात आला आहे. याविरोधात शुक्रवारी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी येथील डाकघर कार्यालयाला धडक दिली. मालवणचे भूषण असलेले प्रधान डाकघर जिल्ह्यातच राहिले पाहिजे. हे कार्यालय अन्यत्र हलवण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबत माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
यावेळी पोस्ट मास्तर प्रदीप मेश्राम यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सहायक पोस्ट मास्तर सुनील मोटे, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, माजी नगरसेवक विलास मुणगेकर, माजी नगरसेविका पूजा सरकारे, मोहन वराडकर, आबा हडकर, राजू बिडये, महेश सारंग, जॉमी ब्रिटो, अंतोन फर्नांडिस, बाबू डिसोझा, अण्णा नायर आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
मालवण येथे असणारे प्रधान डाकघर हे पोस्टाच्या स्वमालकीचे प्रधान डाकघर आहे. सर्व सुविधा व ग्राहकांची चांगली सेवा देणारे प्रधान डाक घर म्हणून त्याची ओळख आहे. मात्र डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी मालवण मधील प्रधान डाकघर सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रशस्त व मालवणचे भूषण असणारे प्रधान डाकघर जिल्ह्यात अन्यत्र हलविण्याचा प्रयत्न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने मालवणच्या जनतेला घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी भाजपा पदाधिकारी यांनी दिला. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून मालवण शहर पर्यटन दृष्ट्या अग्रेसर असणारे शहर आहे. त्यात प्रधान डाकघर हे सुविधांचे केंद्र आहे. तरी प्रधान डाकघर मालवणातच ठेवण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निलेश राणेंच्या माध्यमातून पाठपुरावा : केनवडेकर
गुरुवारी मालवण दौऱ्यावर आलेल्या भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांना येथील डाकघर स्थलांतरित करण्यात प्रयत्न होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येणार असून माजी खासदार निलेश राणे स्वतः डाक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मालवण येथील प्रधान डाक घर आहे त्याच ठिकाणी कायम ठेवावे, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती विजय केनवडेकर यांनी यावेळी दिली.
मालवणवासियांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका
मालवण येथील प्रधान डाकघराच्या माध्यमातून जनतेला अतिशय चांगली सेवा मिळत आहे. असे असताना स्वतःच्या मालकीच्या इमारतीत असणारे कार्यालय इतर तालुक्यात भाड्याच्या जागेत घालवण्या मागील प्रयोजन काय ? असा सवाल सुदेश आचरेकर आणि दीपक पाटकर यांनी उपस्थित केला. कोणत्याही परिस्थितीत हे कार्यालय येथून हलवून देणार नाही. वेळप्रसंगी या विरोधात आंदोलन उभारले जाईल असा इशारा देतानाच मालवण वासियांच्या सहनशीलतेचा अंत बघू नका असे श्री. आचरेकर आणि श्री. पाटकर म्हणाले.