मालवणात वीज वितरणच्या अधीक्षक अभियंत्यांसमोर उभा राहिला तक्रारींचा “डोंगर”

शहर शाखा अभियंता भुजबळ यांच्या मनमानी कारभाराबाबत लोकप्रतिनिधींचा “संताप”

अधिकारी फोन उचलत नसल्याने प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांची घरेच बनलीत वीज वितरणची “कार्यालये”

कुणाल मांजरेकर

मालवण : तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी बुधवारी मालवणात आलेल्या वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या समोर नागरिकांनी तक्रारींचा डोंगर उभा केला. आपल्या विविध समस्यांबाबत नागरिकांनी ऊहापोह करतानाच या समस्या सोडवण्याची आग्रही मागणी केली. तर आजी- माजी लोकप्रतिनिधीनी वीज वितरणच्या कार्यालयाकडून ग्राहकांना मिळणाऱ्या वागणुकीबाबत संताप व्यक्त केला. शहर विभागाचे अभियंता भुजबळ हे नागरिकांना उद्धट उत्तरे देतात, लोकप्रतिनिधीनी नागरिकांच्या कामासाठी फोन केला तर त्यांना देखील नीट उत्तरे देत नाहीत, त्यामुळे अशा अधिकाऱ्याची तात्काळ शहरातून उचलबांगडी करावी, अशी मागणी माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केली. तर वीज वितरणचे अधिकारी फोन उचलत नसल्याने प्रत्येक वॉर्डात नगरसेवकांची घरेच वीज वितरणची कार्यालये बनली आहेत, असे भाई कासवकर यांनी सांगितले. या सर्व प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्याची ग्वाही श्री. पाटील यांनी दिली.

आमदार वैभव नाईक यांच्या मागणीनुसार मालवण मधील वीज समस्या व ग्राहक तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी वीज वितरणच्या माध्यमातून वीज वितरणचे कणकवलीचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते हे बुधवारी सकाळी मालवण येथील वीज कार्यालयात उपस्थित राहिले. यावेळी त्यांच्याकडे मालवणातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांनी वीज समस्या मांडल्या. यावेळी उपकार्यकारी अभियंता गणेश साखरे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी नगरसेवक मंदार केणी, बाबी जोगी, जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष सहदेव साळगावकर, मिलिंद झाड, भाई कासवकर, यशवंत गावकर, दादा वेंगुर्लेकर, महेश जावकर, मंगेश जावकर, संमेश परब, नरेश हुले, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, स्वप्नील आचरेकर, मकरंद चोपडेकर, अमेय देसाई, माजी पं. स. सदस्या सौ. मधुरा चोपडेकर यांच्यासह अन्य नागरीक उपस्थित होते.

गतवर्षी तौक्ते वादळात मालवणसह वायरी, तारकर्ली, देवबाग या किनारी भागात वीज पोल कोसळून व वीज तारा तुटून मोठे नुकसान झाले होते. मात्र अद्यापही अनेक ठिकाणी नव्या तारा बसविण्यात आलेल्या नाहीत, त्या बसविण्यात याव्यात अशी मागणी यावेळी नागरिकांनी केली. तर वायरी तारकर्ली देवबाग ही पर्यटन गावे असल्याने याठिकाणी वीज पुरवठ्यावर ताण असून व्यावसायिक वीज जोडणी बरोबरच ट्रान्सफॉर्मरची संख्या वाढविणे गरजेचे आहे. या गावांतील रस्त्यांच्या कडेला वादळात तुटून पडलेले वीज पोल अद्यापही तसेच पडून असून यामुळे पर्यटकांच्या गाड्यांना अपघात होत आहेत. हे तुटलेले पोल हटविण्यात यावेत. अलीकडेच वीज अधिकाऱ्यांनी या तिन्ही गावाचा सर्व्हे केला असून त्यात नमूद केलेल्या वीज समस्यांचे निराकरण तातडीने व्हावे, या २० कि.मी. लांबी असलेल्या या किनारी गावांमध्ये एलटी कंडक्टर बसविण्यात यावेत अशा मागण्या यावेळी तारकर्ली पर्यटन संस्थेतर्फे सहदेव साळगावकर व बाबा मोंडकर यांनी केल्या. यावर अधीक्षक अभियंता पाटील यांनी एलटी कंडक्टर साठी रत्नसिंधु योजने अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.

काही ठिकाणी जास्त क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर ची गरज असून त्यासाठी नागरिक जागाही द्यायला तयार आहेत. मात्र वीज वितरणचे अधिकारी अशा ठिकाणी सर्व्हे करण्यास न जाताच जागा उपलब्ध नाही म्हणून सांगतात. मात्र प्रत्यक्ष पाहणी करून लोक देत असलेल्या जागेत ट्रान्सफॉर्मर उभारले जावेत अशी मागणी यावेळी हरी खोबरेकर यांनी केले.

वीज समस्येच्या वेळी वीज कर्मचारी फोन उचलत नाहीत. शहर शाखा अभियंता यांचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यांच्या जागी नवीन अधिकारी नियुक्त करावा अशी मागणी यावेळी मंदार केणी यांनी केली. वीज समस्यांवर वीज अधिकाऱ्यांचा कोणताच लक्ष नाही. वीज समस्यांच्या वेळी लोकप्रतिनिधींनीना धावावे लागते. वीज वाहिन्यांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक आहे. गावागावातील वीज कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करून त्यांची ड्युटी निश्चित करावी. अशा मागण्या यावेळी उपस्थित नागरिकांनी केल्या.

यावेळी बोलताना अधीक्षक अभियंता पाटील यांनी नागरिकांनी मांडलेल्या सर्व वीज समस्या व तक्रारी आपण जाणून घेतल्या असून येत्या चार दिवसात त्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तसेच वीज पुरवठ्या बाबत आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी प्रस्ताव मागवून रत्नसिंधू योजनेतून निधी खर्च करण्यात येईल, असेही पाटील यांनी सांगितले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!