शिवसेनेच्या टोलविरोधी भूमिकेबाबत संभ्रम ; निलेश राणेंनी केलं “ट्विट”
टोल वरील कामगार भरतीसाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची “जाहिरातबाजी”
कुणाल मांजरेकर
मुंबई- गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्णावस्थेत असतानाही रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात टोलनाके सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीकडून प्रयत्न सुरू आहेत. भाजपा, शिवसेनेसह राजकीय पक्षांकडून या टोलनाक्यांना जोरदार विरोध होत असून स्थानिक वाहनांना टोल मधून सूट मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मंगळवारी केलेल्या एका ट्विटमुळे शिवसेनेची टोलबाबतची भूमिका नक्की काय ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एकीकडे शिवसेना टोलनाक्याला विरोध करीत असतानाच शिवसेनेच्या राजापूर मधील माजी नगरसेवकाच्या नावे टोलनाक्यावरील भरतीसाठी सोशल मीडियावर “जाहिरात” करण्यात येत असल्याचा फोटो निलेश राणेंनी ट्विट केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या “टोल विरोधी” भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून गेली अनेक वर्षे हे काम रेंगाळले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्गाचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी रत्नागिरी, रायगड मध्ये अद्याप महामार्गाचे काम अपूर्ण आहे. तसेच स्थानिक जमीन मालकांना अनेक ठिकाणी मोबदला देखील देण्यात आलेला नाही. असे असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हातीवले येथे टोलनाके उभारून टोल वसुली सुरू करण्याचा प्रयत्न अलीकडेच संबंधित टोल कंपनीने केला. मात्र भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेने या टोल वसुलीला विरोध करीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदणीकृत वाहनांना टोलमधून सूट द्यावी, अशी आग्रही भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे राजापूर मधील माजी नगरसेवक सौरभ खडपे यांच्या नावे असलेली टोल नाक्यावरील कामगार भरतीची जाहिरात भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट केली आहे. यामध्ये टोलनाक्यावर नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे नमूद करून मोबाईल नंबर देण्यात आला आहे. याच विषयावरून निलेश राणे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. “मुंबई-गोवा महामार्ग ६६ टोल नाक्यावर कामगार भरती पण शिवसेना करतेय आणि टोलला विरोध पण. हा शिवसेनेचा नगरसेवक जो स्वतःच्या बापाचा टोल असल्यासारखा नोकऱ्या वाटतोय. ठेकेदारावर बसून नोकरीचे तास व पगार ठरवले. पण रत्नागिरी-सिंधुदुर्ग रजिस्टर गाड्या टोलमुक्त असाव्यात असं शिवसेनेला वाटत नाही” असं निलेश राणेंनी म्हटलं आहे. एकीकडे शिवसेना टोलविरोधी आंदोलनात आघाडीवर असताना त्यांच्याच पक्षाच्या माजी नगरसेवकाचा टोलवरील नोकऱ्या वाटत असल्याचा फोटो व्हायरल झाल्याने शिवसेनेची टोलबाबत नक्की भूमिका काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.