जिल्हा रुग्णालयात एनएचएम अंतर्गत कार्यरत ३०० कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता !

शासकीय मेडिकल कॉलेजच्या नावाखाली जिल्हा रुग्णालयाची परवड ; भाजपचा आरोप

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केवळ ५ विद्यार्थ्यांचाच प्रवेश ; रुग्णसेवेचाही बोजवारा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी तीव्र आंदोलन छेडणार : दादा साईल यांचा इशारा

कुणाल मांजरेकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवेचा बोजवारा उडल्याचा आरोप भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी केला आहे. केवळ राणे द्वेषापोटी सुरू करण्यात आलेल्या या मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने जिल्हा रुग्णालय येथून हलवण्याचा घाट घालण्यात आला असून वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या नावाखाली जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी पॅरामेडिकल स्टाफ व इतर कर्मचारी वर्ग असे मिळून सुमारे ३०० लोकांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. त्यामुळे या कंत्राटी कामगारांना तात्काळ परत घेण्यात यावे, त्याचप्रमाणे येथील आरोग्य व्यवस्था सुधारावी आणि हे वैद्यकीय महाविद्यालय अन्यत्र शासकीय जागेत तात्काळ हलविण्यात यावे, याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येणार आहे. यासाठी उद्याच जिल्हाधिकारी त्याप्रमाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती श्री. साईल यांनी दिली.

या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी पडवे येथे एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल चालू केले. आणि त्यानंतर सत्तेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व नेत्यांच्या पोटात दुखायला लागले. त्यांनी आपल्या सत्तेचा वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा घाट घातला. गेल्या तीन-चार वर्षांच्या अथक झटापटी नंतर यंदापासून जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय ओरोस या ठिकाणी सुरू झाले आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा, जमीन, जागा, हॉस्टेल, इतर इमारती इत्यादी कोणत्याही व्यवस्था न करता त्या ओरोस येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अगोदरच जिल्हा सामान्य रुग्णालयातील तुटपुंज्या असलेल्या रुग्णसेवा आता पूर्णपणे बंद करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर आली आहे.

या जिल्हा सामान्य रुग्णालय असलेल्या इमारतींचा बराचसा भाग हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयसाठी वापरास देण्यात आलेला असून खुद्द जिल्हा शल्य चिकित्सक यांचे राहते शासकीय निवासस्थान देखील या महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना देण्यात आले आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपी स्टाफ याठिकाणी नेमण्यात आला नाही. तसेच या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे हॉस्टेल किंवा कॅन्टीनची सोय देखील उपलब्ध नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या आस्थापनेची किंवा इतर मनुष्यबळाची नेमणूक न करता फक्त राणे द्वेषापोटी आणि राजकीय स्वार्थाने कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्यासाठी हे वैद्यकीय महाविद्यालय चालू करण्यात आले आहे. आजमीतीला माहिती घेतली असता या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जिल्ह्यातील फक्त पाच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे या महाविद्यालयाचा उपयोग ना जिल्ह्यातील रुग्णसेवा सुधारण्यासाठी होत आहे, ना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी.. हे महाविद्यालय सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील आरोग्यव्यवस्था किती सुधारली ?? याचे शिवसेनेच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे.

कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा कोणत्याही प्रकारची व्यवस्था सत्तेतील शिवसेनेच्या नेत्यांनी केलेली नाही. जिल्ह्यातील अगोदरच तुटपुंजी असलेल्या सामान्य रुग्णालयातील सर्व सेवा बंद केली आहे. वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याच्या नावाखाली या ठिकाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील एनएचएम अंतर्गत कार्यरत असलेले कंत्राटी विशेष तज्ञ, वैद्यकीय अधिकारी पॅरामेडिकल स्टाफ, व इतर कर्मचारी वर्ग असे मिळून सुमारे ३०० लोकांना तडकाफडकी घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.  त्यामुळे हे वैद्यकीय महाविद्यालय नेमके कोणाच्या सोयीसाठी आहे ?? जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळणार की नाही, जिल्ह्यातील रुग्णांना सेवा मिळणार की नाही ? स्थानिकांना रोजगार मिळणार की नाही ? असलेला रोजगार घास काढून घेणार अशी या महाविद्यालयाची अवस्था आहे. शिवसेनेच्या नेत्यांना फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आणि कोटींचा मलिदा खाण्यासाठी या वैद्यकीय महाविद्यालयाची आवश्यकता आहे. त्यामुळे आज जवळपास तीनशे कुटुंबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे, असे दादा साईल यांनी म्हटले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!