अतिवृष्टीचा फटका बसलेले भडगाव दोन दिवसांपासून प्रशासकीय यंत्रणेच्या प्रतीक्षेत ; आ. वैभव नाईकांचेही दुर्लक्ष

भाजपच्या दादा साईल यांचा आरोप : जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा व्हेंटिलेटरवर गेल्याची टीका

भाजपाच्या माध्यमातून गावात आवश्यक मदतकार्य करण्याची ग्वाही

कुडाळ : कुडाळ तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीत भडगाव मलाडवाडी येथे सुमारे २० ते २५ कुटुंबीयांना जोरदार फटका बसला. या भागातील घरांवरील छप्पर, कौले, पत्रे वादळी वाऱ्याने उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याप्रमाणे पावसाचे पाणी घरात गेल्याने घरातील चीजवस्तू व अन्नधान्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची प्रशासनाला माहिती देऊनही अद्यापपर्यंत प्रशासकीय यंत्रणा पंचनाम्यासाठी या गावात पोहोचलेली नाही. भाजपचे ओरोस मंडल तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी प्रशासकीय यंत्रणेच्या या हलगर्जीपणा बद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

या भागात नेहमी कार्यतत्परतेचा आव आणणारे आणि वेळोवेळी ग्रामस्थांच्या मदतीला धावून जाण्याचे नाटक करणारे आमदार वैभव नाईक यावेळी कुठेही दिसले नाहीत. ते फक्त पेपर मधून आणि बातम्यांमधून दिसत असतात, असा आरोप दादा साईल यांनी करून या कठीण प्रसंगात ग्रामस्थांना धीर देण्यासाठी आणि आवश्यक मदतकार्य पोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भाजपच्या वतीने आवश्यक मदत आणि प्रशासकीय यंत्रणेमार्फत होणारे सहकार्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्री. साईल यांनी म्हटले आहे.

दोन दिवसांपूर्वी भडगाव मध्ये झालेल्या वादळी वाऱ्यात या भागातील शेतकऱ्यांचे माड, आंबे, फणस आदी फळझाडे व जंगली झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून, मोडून पडली आहेत. तसेच विजेचे खांब तुटून पडल्याने विद्युत पुरवठा देखील खंडित झाला आहे. भडगाव गावातील भाजपा कार्यकर्त्यांनी या सर्व प्रकाराची कल्पना दिल्यानंतर दादा साईल यांनी भडगाव मलाडवाडी येथील नुकसानग्रस्त भागाला भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार अमोल पाठक यांच्याशी फोन वरून संपर्क साधत झालेल्या नुकसानीची पंचयादी तत्काळ करण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे महावितरणचे उपअभियंता आणि अधिकारी यांना धारेवर धरत संध्याकाळ पर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची सूचना दिली. मात्र ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवस उलटून गेल्यानंतरही संबंधित आपत्कालीन यंत्रणा किंवा महसूल विभाग यांचे तलाठी, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी यांनी साधी विचारपूस करण्याचे देखील सौजन्य दाखवले नाही. फक्त ग्रामसेवक आणि सरपंच भेट देऊन पाहणी करून गेल्याचे समजते. गेल्यावर्षी देखील झालेल्या वादळातील पंचयादी उशिरा झाल्याने आम्हाला कोणत्याही प्रकारचा मोबदला आणि मदत मिळाली नाही अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली.


दोन दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारचे पंचनामे न झाल्याने नाईलाजाने ग्रामस्थांनी झाडे तोडून बाजूला करून आपली घरे पूर्ववत केली आहेत. पावसाळा तोंडावर असताना जिल्हा प्रशासनाची आपत्कालीन यंत्रणा एवढी सुस्त असेल तर येणाऱ्या पावसाळ्यात सगळीकडे हाहाकार उडाल्याशिवाय राहणार नाही, असे दादा साईल यांनी म्हटले आहे. यावेळी तालुका सरचिटणीस देवेंद्र सामंत, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण घाडी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते योगेश घाडी, राजेंद्र राणे, रवी लोट, प्रितेश गुरव, विवेक कदम आणि स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!