… तर महावितरणला जबाबदार धरणार ; “त्या” प्रश्नावरून दीपक पाटकर आक्रमक
कुणाल मांजरेकर : मालवण
पावसाळा तोंडावर आला असून अद्याप शहरात विद्युत वाहिन्यांवरील धोकादायक झाडे जैसे थे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात ही झाडे वीज वाहिन्यांवर पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने तात्काळ ही धोकादायक झाडे तोडून घ्यावीत. पावसाळ्यात याठिकाणी कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वीज वितरण कंपनीची राहील, असा इशारा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी वीज वितरण कंपनीला एका निवेदनाद्वारे दिला आहे.
पावसाळ्यापूर्वी महावितरण कंपनी कडून वीज वाहिन्यांवरील धोकादायक झाडे, माडांची तोडणी करण्यात येते. मात्र अद्यापही शहरात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यांवर धोकादायक झाडे कायम आहेत. या प्रकरणी दीपक पाटकर यांनी वीज वितरण कंपनीचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे. मालवण शहरातील मोक्याच्या ठिकाणी विद्युत वाहिनीवर आलेल्या फांद्या व माडाच्या झावळ्या नेहमी त्रासाचे कारण बनले असून दररोज लाईट जाणे व होल्टेज वाढणे हा प्रकार सर्रास होत आहेत. विद्युत वाहिनीवर आलेली मोठी झाडे व माड ज्यांचे कोणाचे असतील त्यांना आपण नोटीसीव्दारे ती झाडे किंवा माड लवकरात लवकर तोडून घेण्याबाबत कळवावे. ही झाडे किंवा माड लवकरात लवकर न तोडल्यास त्यामुळे अपघात किंवा काही मोडतोड किंवा जिवीतहानी झाल्यास सर्व जबाबदारी वीज वितरण कंपनीची राहील, असे सांगून देऊळवाडा ऑक्ट्रॉय नाका ते भरड या मार्गावरील झाडे, फांद्या व झावळे त्वरीत तोडण्याची व्यवस्था करावी, असे त्यांनी म्हटले आहे.
देऊळवाडा येथील महाराजा हॉटेलच्या बाजूला आलेली आंब्याची फांदी व याच मार्गावरील झाडे धोकादायक आहेत. हा मुख्य महामार्ग असून शहराचा संपूर्ण वीज पुरवठा येथून होतो. त्यामुळे पावसाळ्यात या फांद्या येथील वीज वाहिनीवर पडल्यास संपूर्ण शहर काळोखात राहणार असल्याचे दीपक पाटकर यांनी म्हटले आहे.