फडणवीस मुख्यमंत्री असताना मालवण शहरासाठी किती निधी आणलात ते जाहीर करा !

मंदार केणींचे भाजप नेत्यांना आव्हान ; मुख्याधिकाऱ्यांच्या कामाची केली पाठराखण

मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरून भाजप मध्येच एकवाक्यता नसल्याचा आरोप

कुणाल मांजरेकर : मालवण

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना सुरुवातीच्या अडीच वर्षात मालवण नगरपालिकेवर भाजपाचे वर्चस्व होते. उपनगराध्यक्ष, बांधकाम सभापती, आरोग्य सभापतीसह स्थायी समितीही भाजपाच्या ताब्यात होती. यावेळी भाजपने मालवण शहराच्या विकासासाठी किती निधी आणला, ते विजय केनवडेकर यांनी जाहीर असे आव्हान शिवसेनेच्या मंदार केणी यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. आमदार वैभव नाईक आणि मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांच्यामुळेच प्रशासनाच्या राजवटीतही मालवण शहरात वेगाने विकासकामे होत आहेत, असे सांगून मुख्याधिकार्‍यांची जोरदार पाठराखण मंदार केणींनी केली. नगरपालिकेवर भाजपाचे वर्चस्व असताना तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेला निधी भाजपाच्या नगरसेवकांनी अनावश्यक गटार बांधण्याच्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतेही विकास काम केले नाही, असा आरोपही श्री. केणी यांनी केला.

येथील शिवसेना शाखेत माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाचे प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन मुख्याधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, उमेश मांजरेकर, भाई कासवकर, यशवंत गावकर, प्रसाद आडवलकर आदी उपस्थित होते. यावेळी श्री. केणी म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना नगरपालिकेवर भाजपाचे प्राबल्य होते. यांचे राज्यसभेतही दोन खासदार होते तसेच मुख्यमंत्री पदासह नगरविकास खाते देखील भाजपकडे होते. एवढे असताना तुम्ही सत्तेचा वापर करून थेट नगरपालिकेला किती निधी आणला, याचा खुलासा करावा. दीपक केसरकर पालकमंत्री असताना आलेल्या निधीतून अनावश्यक व्हाळ्या आणि गटार खोदाई सोडून यांनी वार्डात कोणतेही काम केले नाही. राजकोट ते कचेरी, दांडी आवार ते मच्छि लिलाव ठिकाणी जाणाऱ्या रस्त्यावर अनावश्यक पद्धतीने गटार बांधून पालिकेचा निधी वाया घालवण्याचे काम यांनी केले. मागील दोन वर्षे कोरोनामुळे विकास कामांसाठी निधी आला नाही. मात्र आता कोरोना काळ संपल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मधून मालवण नगरपालिकेला भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. याचे श्रेय आमदार वैभव नाईक यांना जाते. तसेच आलेल्या निधीचे योग्य विनियोजन करण्याचे काम मुख्याधिकारी आणि त्यांचे सहकारी करीत आहेत. काही माजी नगरसेवकांना प्रशासकीय राजवट असल्याने हस्तक्षेप करता आला नाही. काहीनी कामे होणार नाहीत, यासाठीही प्रयत्न केले, मात्र निसर्गाने देखील प्रशासनाला साथ दिली असून पावसाळा लांबल्याने विकास कामे देखील निर्धारित वेळेत पूर्ण होत आहेत, असे ते म्हणाले.

भाजपचे नगरसेवक सुशेगात !

आमचा नगरसेवक पदाचा कालावधी संपला असला तरी आता होणाऱ्या विकास कामांसाठी पाठपुरावा कोणी केला, आता देखील ही विकास कामे मार्गी लागण्यासाठी कोण प्रयत्न करीत आहे, हे जनता जाणून असल्यानेच आम्हाला नागरिक स्वतःहून भूमीपूजनाची संधी देत आहेत. पण भाजपचे नगरसेवक सुशेगात असून स्वतःच्या वार्डात होणाऱ्या कामांचा पाठपुरावा देखील त्यांच्याकडून होत नसल्याचे मंदार केणी म्हणाले.

विरोधकांच्या वार्डात देखील विकास कामे

शहरात विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डात कामे होत नसल्याच्या आरोपाचा मंदार केणी यांनी समाचार घेतला. बाजारपेठ, मशिदगल्ली रस्ता, बाळू कोळंबकर घर ते गवंडीवाडा रस्ता, बेवडा बिल्डिंग ते काळबादेवी रस्ता, सुरेश प्रभू गल्ली, आडवण येथील गणेश कोंड रस्ता, वायरी जोडरस्ता अशी कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून झाली असून ही सर्व कामे विरोधकांच्या वॉर्डातील आहेत. मात्र ही कामे करताना स्थानिक नगरसेवकांची आत्मीयता दिसून आली नाही, असा आरोप मंदार केणी यांनी केली.

… तर शिवसेना मुख्याधिकाऱ्यांच्या पाठीशी : बाबी जोगी

भाजपचे मंडल अध्यक्ष मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्या कार्यपद्धतीवर टीका करतात. तर त्यांच्याच पक्षाचे अन्य पदाधिकारी मुख्याधिकारी यांचे कौतुक करीत क्लीन चिट देतात, त्यामुळे भाजपमध्येच एकवाक्यता नसल्याचे मंदार केणी म्हणाले. तर चांगले काम करणाऱ्या मुख्याधिकारी याना त्रास देण्याचा प्रयत्न शिवसेना खपवून घेणार नाही, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिला आहे.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!