भाजपा गटनेते विलास कुडाळकर यांचा पाठपुरावा ; तब्बल २५ वर्षांनंतर “या” रस्त्याचे डांबरीकरण
कुडाळ : कुडाळ शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. जी एस कुलकर्णी यांच्या रुग्णालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे तब्बल २५ वर्षानंतर खडीकरण व डांबरीकरण नगरपंचायतीच्या नगरोत्थान निधीमधून भाजपचे गटनेते तथा प्रभागाचे नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे येथील नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील डॉ. कुलकर्णी यांच्या रुग्णालयकडे जाणारा रस्ता हा गेली २५ वर्षापासून खड्डेमय होता. त्यामुळे येथील नागरिक तसेच रुग्णालयात जाणाऱ्या महिला रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे येथील रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावा अशी मागणी येथील नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत होती. दरम्यान येथील खड्डेमय रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होणार्या त्रासाची दखल घेऊन या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम माजी खासदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागाच्या माजी नगरसेविका सरोज जाधव यांच्या प्रयत्नांमुळे मंजूर झाले होते. त्यानंतर भाजपाचे गटनेते व प्रभागाचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी सतत पाठपुरावा केला व नगरपंचायतीच्या नगरोत्थान निधीमधून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून हा रस्ता पूर्ण केला. खडीकरण व डांबरीकरण पूर्ण झालेल्या या रस्त्याचा शुभारंभ डॉ. जी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, शहराध्यक्ष राकेश कांदे, भाजपा गटनेते विलास कुडाळकर, भाजपा नगरसेवक अभिषेक गावडे, निलेश परब, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदनी कांबळी, माजी नगरसेविका प्रज्ञा राणे, रेवती राणे, अनुप जाधव, निनाद हिर्लेकर, बाबा पोरे, दिपक भोगटे, राजेश कोरगावकर, बिजेन्द्र यादव, कोरगावकर तसेच इतर नागरिक उपस्थित होते. तब्बल २५ वर्षानंतर सदरच्या रस्त्याचे डांबरीकरण व खडीकरण पूर्ण झाल्यामुळे यावेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले.