मालवणात कुजलेल्या स्थितीत अनोळखी मृतदेह आढळला ; पोलीस तपास सुरू
मालवण : शहरातील वायरी गर्देरोड मार्गावर एका बंद घराच्या बाहेरील ओट्यावर ४५ ते ५० वर्षे वयोगटातील एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी सायंकाळी सडलेल्या स्थितीत दिसून आला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवराज झांझुर्णे, विलास टेंबुलकर हे पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पूर्णपणे सडलेल्या स्थितीत तसेच हाताची हाडे बाहेर आल्या स्थितीत होता तसेच दुर्गंधी पसरली होती. माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, संमेश परब, संतोष लुडबे, तृप्ती मयेकर, जयमाला मयेकर, ढोले बाबू यासह अन्य स्थानिकांनी त्याठिकाणी धाव घेतली. ढोले बाबू, राजू वराडकर व सहकाऱ्यांच्या मदतीने मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज व्यवस्था बंद असल्याने शवविच्छेदन करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या मृतदेहाला १५ दिवस कालावधी उलटला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मृतदेहाचा काही भाग कुत्र्यांनी खाल्ला होता. मृत्यू झालेली व्यक्ती त्या ठिकाणी झोपायला येत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. दरम्यान परिसरातील कोणीही व्यक्ती बेपत्ता नोंद नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी सांगितले.