भाजपा किसान मोर्चातर्फे आचरा येथे ना. राणेंचे जंगी स्वागत करणार !
कुणाल मांजरेकर
मालवण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची आशीर्वाद यात्रा शनिवारी २८ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गात येत आहे. आचरा येथून ही यात्रा मालवण तालुक्यात प्रवेश करणार असून आचरा तिठा येथे ना. नारायण राणेंचे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस उमेश सावंत, मालवण तालुका मंडळ अध्यक्ष किशोर नरे, उपाध्यक्ष महेश सारंग, प्रकाश राणे, हरीभाऊ केळुसकर, प्रसाद भोजने, महेश वरक आदींनी दिली आहे.
भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक मदत पोहोचवावी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली आहे. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला असून भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा आणि किसान सन्मान निधी लाभार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आचरा तिठा येथे केंद्रातील मोदी सरकारचा सन्मान करण्याच्या दृष्टीने मोदी सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.