गुजरातला वादळावेळी केंद्राकडून कोट्यवधींची मदत ; “तौक्ते” वेळी सिंधुदुर्गात राणेंनी किती आणले ?
आ. वैभव नाईक यांचा सवाल ; वादळग्रस्तांना राज्य शासनाकडून ४० कोटींची मदत
वादळ कालावधीत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर ; नारायण राणे आणि त्यांचे कार्यकर्ते होते कुठे ?
कुणाल मांजरेकर
मालवण : गुजरातला वादळाचा तडाखा बसला तेव्हा केंद्राकडून कोट्यवधींचे पॅकेज देण्यात आले. मात्र सिंधुदुर्गातील तौक्ते वादळावेळी नारायण राणे केंद्रात मंत्री असताना त्यांनी वादळग्रस्तांना एक रुपया तरी आणला का ? असा सवाल शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. तोक्ते वादळ झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्य शासनाने ४० कोटी रुपयांचा निधी नुकसान भरपाईपोटी उपलब्ध करून दिला. यात मालवण शहरासह किनारपट्टी भागातील नुकसानग्रस्तांना जास्त आर्थिक मदत मिळाली. मालवणला सर्वांधिक पैसे मिळाले. ज्यांनी ज्यांनी पंचनामे केले त्या सर्वांना नुकसान भरपाईची रक्कम मिळाली, असे सांगून वादळाच्या काळात नारायण राणे व त्यांचे कार्यकर्ते कुठे होते? असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केला.
कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, बाबी जोगी, मंदार केणी, बाबा आंगणे, प्रसाद मोरजकर, बाळ महाभोज यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. देवबाग येथे काल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तोक्ते वादळग्रस्तांना राज्य शासनाने एकही रुपयाची नुकसान भरपाई दिली नाही असा आरोप केला होता. याचा खरपूस समाचार घेताना आमदार नाईक यांनी राणेंवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, गुजरातला ज्यावेळी वादळ झाले त्यावेळी गुजरातला केंद्र शासनाचे पॅकेज देण्यात आले. परंतु नारायण राणे हे केंद्रात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करत असताना त्यांच्या जिल्ह्यात तोक्ते वादळ झाले तेव्हा ते एकही रुपया आणू शकले नाहीत. राणे फक्त शिवसेनेवर आरोप करण्यासाठी केंद्रात मंत्री आहेत आणि हे जिल्ह्यातील जनतेला गेल्या वर्षभरात कळून चुकले आहे. केंद्रातून ते एक रूपयाचा निधी आणि एकही रोजगार आणू शकलेले नाहीत. शिवसैनिक पहिल्यापासून आहे त्याचप्रमाणे ८० टक्के समाजकारणाचे काम करत आहेत. ज्यावेळी तौक्ते वादळ झाले त्यावेळी सुरुवातीचे दहा दिवस शिवसेनेचे तालुकाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, पदाधिकारी हे रस्त्यावर उतरून काम करत होते. शहरातील वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. याउलट या काळात नारायण राणे व त्यांचे कार्यकर्ते कुठे होते ? त्यामुळे तोक्ते वादळग्रस्तांना मदत करण्याच्या विषयासंदर्भात कोणताही आरोप करण्याचा नैतिक अधिकार राणेंना नाही.
राणेंनी अजूनही केंद्राकडून निधी आणता आला तर पहावा
तोक्ते वादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यास केंद्राची समिती ही उशिरा आली होती. त्यावेळी राणेंची ताकद काय आहे हे दिसून आले. त्यामुळे या समितीकडून जिल्ह्याला काही मदत मिळेल का? हे त्यांनी पहावे आणि नंतरच आरोप करावेत, असा सल्ला वैभव नाईक यांनी दिला आहे. आमच्यावर आरोप करण्यापूर्वी राणेंनी केंद्राकडून किती निधी आला, दिलेल्या आश्वासनांचे काय झाले याचा विचार करावा. अनेक खासदार आपल्या विभागात रस्त्यांच्या विकासासाठी केंद्राचा फंड घेवून जातात. राणेंनी वर्षभरात केंद्रातून किती फंड आणला याचा विचार करावा. आम्ही बंधार्यांच्या कामासाठी सुरुवातीस बजेटमध्ये तरतूद केली. त्यानंतर बंधारे मंजूर झाले. आम्ही सीआरझेडची परवानगी घेवून सुरू केलेली बंधाऱ्याची राज्यातील ही पहिली कामे आहेत. देवबाग मधील जिओ ट्यूबच्या बंधाऱ्यांची कामे निकृष्ट झाल्याने त्या ठेकेदाराचे उर्वरित दीड कोटी रुपयांचे बिल दिलेले नाही. येत्या काळात जिओ ट्यूबच्याऐवजी दगडी बंधार्याची कामे केली जाणार आहेत, असे वैभव नाईक म्हणाले.
काम सुरू न झालेल्या बंधाऱ्याचे राणेंकडून भूमिपूजन
मालवणच्या किनारपट्टीवरील बंधार्याची कामे वर्षभरापूर्वीच मंजुर झाली होती. मात्र सीआरझेड, कांदळवन सह अन्य परवानग्या राहिल्या होत्या. त्या मिळाल्यानंतर आम्ही तळाशील व देवबाग येथील कामांची भूमिपूजने केली. आम्ही भूमिपूजन केलेली कामे सुरू आहेत. याउलट सुरू न झालेल्या कामाचे भूमिपूजन राणेंनी केले. राणेंनीही बंधार्याचे काम करावे त्याला आमचा विरोध नाही, असे वैभव नाईक म्हणाले.
जिल्ह्यात शासनाच्या माध्यमातून तोक्ते वादळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला. मालवण पालिकेने कोव्हिड सेंटर पहिले सुरू केले. या सेंटरमुळे अनेकांचे प्राण वाचले. शासकीय रुग्णालयात किती जणांचे प्राण वाचले आणि खाजगी रुग्णालयात किती खर्च झाला याची राणेंनी माहिती करून घ्यावी असेही श्री. नाईक म्हणाले.
देवबागात यापूर्वीही ८५ लाख खर्च : खोबरेकर
देवबाग गावातील भाऊ गोवेकर, मोबार, ख्रिश्चनवाडी, भांजीवाडी, श्रीकृष्ण मंदिर येथील बंधार्यांच्या कामासाठी, दुरूस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून यापूर्वी सुमारे ८५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आताच बंधाऱ्यासाठी निधी आणल्याचा आरोप चुकीचा असल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य तथा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी दिली.