राणेंची विश्वासार्हता संपली ; औद्योगिक मेळाव्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांचीही पाठ

५० लाख खर्चून कणकवलीत आयोजित मेळाव्याला ४०० लोकांचीही उपस्थिती नाही

आ. वैभव नाईक यांचा आरोप ; राणेंना आत्मपरीक्षण करण्याचा दिला सल्ला

कुणाल मांजरेकर

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपर्यंत जिल्ह्यात एकही उद्योग अथवा रोजगार आणलेला नाही. त्यामुळे राणेंच्या कार्यपद्धतीला जिल्ह्यातील जनता आणि त्यांचे कार्यकर्ते देखील कंटाळले आहेत. म्हणूनच ५० लाख रुपये खर्चून त्यांनी कणकवलीत घेतलेल्या औद्योगिक मेळाव्याला ४०० लोकांचीही उपस्थिती नव्हती. राणेंची विश्वासार्हता संपल्यामुळेच कणकवलीतील या मेळाव्याचा फियास्को झाला असून या मेळाव्याला त्यांचे स्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिल्ह्यातील जनता का नव्हती, याचा राणेंनी विचार करावा, असा सल्ला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे. राणेंच्या औद्योगिक मेळाव्याचा फियास्को निघाला असताना ज्या कृषी प्रदर्शनावर राणे टीका करतायत, त्या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील ४० हजार जनतेने उपस्थिती दर्शवली, असेही आ. नाईक यांनी म्हटले आहे.

यावेळी आ. नाईक म्हणाले, नारायण राणेंनी जिल्ह्यात कोणताही उद्योग आणला नाही अगर नवीन रोजगार निर्माण केला नाही. केंद्रात एमएसएमई खात्याचे मंत्री झाल्यानंतर देखील राणेंनी वर्षभरात एकही उद्योग अथवा रोजगार जिल्ह्यात आणला नाही. त्यामुळे राणेंना केंद्रातील मंत्री पद केवळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी आहे. राणे आता जिल्ह्यात विकास करू शकत नाहीत आणि उद्योग आणू शकत नाहीत, हे भाजपच्या नेत्यांना आणि जनतेलाही कळून चुकलं आहे. त्या उलट शिवसेनेच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक योजना सुरू आहेत. रत्नसिंधुच्या माध्यमातून सुद्धा रोजगार निर्माण केला जात आहे असे सांगून राणे नेहमी सांगतात, मी उद्योजक आहे. पण त्यांचा कोणीही आदर्श घेऊ नये, राणेंनी कोणते उद्योग केले ते महाराष्ट्रातील लोकांना माहीत आहे, असा टोला आ. वैभव नाईक यांनी लगावला आहे. राणे नेहमी सर्वांवर टीका करतात, मग विरोधी पक्ष असू देत किंवा जिल्ह्यातील जनता. त्यामुळेच दोनदा राणेंचा पराभव झाला आहे. राणे यांच्याकडून मिळणाऱ्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने लोक त्यांना कंटाळले आहेत, असे आ. नाईक म्हणाले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!