मालवणात १२ मे पासून कोकण चित्रपट महोत्सव
सिंधुरत्न कलावंत मंच आणि मालवण नगरपालिकेचे आयोजन
मालवण : सिंधुरत्न कलावंत मंच आणि मालवण नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह येथे १२ ते १४ मे या कालावधीत कोकण चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा होणार असल्याची माहिती सिनेनाट्य अभिनेते विजय पाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपालिका सभागृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्याधिकारी संतोष जिरगे, अविनाश सामंत, गुरू राणे, विजय राणे, सुभाष कुमठेकर आदी उपस्थित होते. विजय पाटकर म्हणाले, कोकण चित्रपट महोत्सव हा कोकणातील कलाकारांचा कोकणातील रसिक प्रेक्षकांसाठी असणार आगळा वेगळा सोहळा आहे. या सोहळ्यानिमित्ताने कोकणातील स्थानिक कलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. त्याचबरोबर अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या कलावंतांना कोकणचे सौदर्य न्याहाळता येणार आहे. १२ मे रोजी सकाळी ११ वाजता प्रितम, २ वाजता फनरल, सायंकाळी ५ वाजता भारत माझा देश आहे, १३ रोजी ११ वाजता हिरकणी २ वाजता फिरस्त्या, सायंकाळी ५ वाजता शहिद भाई कोतवाल, ७ वाजता रिवणावायली आदी चित्रपट मामा वरेरकर नाट्यगृह येथे विनामूल्य दाखविले जाणार आहेत. १४ मे रोजीच्या पारितोषिक वितरण सोहळ्यास स्थानिक कलावंतांचा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. यावेळी अभिनेते सिद्धार्थ जाधव, अलका कुबल, किशोरी शहाणे, प्रथमेश परब, छाया कदम, नूतन जयंत, उमेश ठाकूर, अमीर हडकर, दिगंबर नाईक आदी कलावंतांची उपस्थिती असणार आहे. हा कार्यक्रम देखील विनामूल्य असणार आहे. सिंधुरत्न कलावंत मंचच्या चित्रपट महोत्सवासाठी पालिकेकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी श्री. जिरगे यांनी सांगितले.