बापलेकाकडे राज्याची सत्ता असूनही कोकणचं पर्यटन दुर्लक्षित !

माजी कृषीमंत्री आ. सदाभाऊ खोत यांची ठाकरे पिता- पुत्रावर टीका

जागतिक पुरस्कार गळ्यात घेऊन फिरण्यापेक्षा कोकणला गळ्यात घेऊन फिरण्याचा आदित्यना सल्ला

कुणाल मांजरेकर

मालवण : कोकणाने शिवसेनेला भरभरून दिले, पण शिवसेनेने कोकणला काय दिले ? आज राज्यात बापलेकाकडे सत्ता असूनही कोकणला त्याचा काय फायदा झाला ? मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे विराजमान आहेत, तर त्यांचेच सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन मंत्री पद आहे. तरीदेखील कोकणचा पर्यटन विकास झालेला नाही. कोकणातील शेतकरी स्वाभिमानी आहे, त्याने कधीही आत्महत्या केली नाही, पण शासनाने अडचणीच्या वेळी कोकणला मदत केली का ? कोकणला क्यार, फयान सारख्या चक्रीवादळाचा फटका बसला. पण नुकसानग्रस्तांना पुरेशी भरपाई मिळाली नाही. येथील पारंपरिक मच्छिमारांचा प्रश्न देखील अद्यापही कायम आहे. अशा परिस्थितीत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जागतिक पुरस्कार गळ्यात घालून फिरण्यापेक्षा कोकणला गळ्यात घेऊन फिरावं, इकडचे प्रश्न मार्गी लावावेत, असा सल्ला रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी कृषिमंत्री आ. सदाभाऊ खोत यांनी मालवण मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

आ. सदाभाऊ खोत यांनी आजपासून “जागर शेतकऱ्यांचा,आक्रोश महाराष्ट्राचा” हा राज्यव्यापी दौरा हाती घेतला असून या दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी मालवण मधून झाली. येथील ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्गला त्यांनी भेट दिल्यानंतर भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, राजन तेली, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, संतोष लुडबे, भाई मांजरेकर, ललित चव्हाण यांच्यासह अन्य भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आ. सदाभाऊ खोत म्हणाले, राज्य सरकारचे सर्वच क्षेत्राकडे दुर्लक्ष झाले आहे. कोकणात बोटींना डिझेल परतावा मिळालेला नाही. फयान, क्यार, तौक्ते सारख्या चक्रीवादळात नुकसान झालेल्या मच्छीमार बोटींना मुबलक अनुदान मिळाले नाही. किनारपट्टीवर पारंपरिक मच्छीमार अडचणीत आला आहे. एलईडी मासेमारीचा मोठा फटका त्यांना बसत असून न्यायासाठी ते आंदोलन करीत आहेत. पण धनदांडग्या पर्ससीन, हायस्पीड यांत्रिकी बोटींना राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही.शिवसेना कोकणच्या बळावर उभी राहिली, पण कोकणला त्यांनी वाऱ्यावर सोडले. येथील शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. नारळ, काजू, आंबा पीक आज अडचणीत आले आहे. तरीपण कोकणातील शेतकरी स्वाभीमानी आहे. त्याने आत्महत्या केली नाही. त्याला शासनाने १०० % कर्जमाफी दिली पाहिजे होती. कोकण पर्यटन विकासात रोल मॉडेल बनले असते. पण कोकणच्या पर्यटन विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अद्याप येथील बंदर विकासाला चालना मिळालेली नाही. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एनडीआरएफचे निकष बाजुला ठेऊन चार पट नुकसान भरपाई दिली. शेतकऱ्यांचे चालू पीक कर्जही माफ केले. हे सरकार शेतकऱ्यांना गुंठ्यांला १३५ रुपये नुकसान भरपाई देत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी ९५० रुपये नुकसान भरपाई मिळवुन दिली होती, याची आठवण खा. खोत यांनी करून दिली.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!