माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर शिवसेनेत पुन्हा सक्रीय ; चाहत्यांमधून समाधान

मंगळवारी दोन कार्यक्रमांना उपस्थिती ; विकास कामाच्या भूमिपूजनासह युवासेनेच्या धडक मोहिमेत सहभाग

कुणाल मांजरेकर

मालवण : मालवण शहराचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आपल्या “वैयक्तिक” कारणास्तव शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची घोषणा करून काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर महेश कांदळगावकर पुन्हा एकदा शिवसेनेच्या उपक्रमात सक्रीय झाल्याचे मंगळवारी दिसून आले. शिवसेनेच्या वतीने मंगळवारी रेवतळे येथे आरसीसी पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आली. या कार्यक्रमाला महेश कांदळगावकर यांनी उपस्थिती दर्शवली. तर मालवण तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत नवोदय परीक्षेसाठी मुलांची बोगस प्रवेश प्रक्रिया दाखवली जात असल्याच्या प्रकारची शिवसेना आणि युवा सेनेने पोलखोल केली. यावेळी देखील महेश कांदळगावकर उपस्थित होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर जाऊ पाहणाऱ्या महेश कांदळगावकर यांचे मतपरिवर्तन करण्यात शिवसेना आमदार, खासदार यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महेश कांदळगावकर यांच्या चाहत्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

मागील नगरपालिका निवडणुकीत शिवसेना- भाजपा युती कडून महेश कांदळगावकर हे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले. मागील पाच वर्षात शहराचा कारभार हाकताना शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांना पक्षात आणण्याचे काम त्यांनी केले. असेच शहर विकासासाठी भरीव योगदान देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. सध्या नगरपालिका निवडणुका लांबल्या असून नगराध्यक्ष आणि नगरसेवकांची मुदत संपून नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूकीत विजय मिळवून पालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकावण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न केले जात असतानाच काही दिवसांपूर्वी नगराध्यक्ष पदाचा पदभार सांभाळलेल्या महेश कांदळगावकर यांनी आपल्या वैयक्तिक कारणामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची घोषणा करून राजकीय गोटात एकच खळबळ उडवून दिली. शिवसेना सोडण्याची घोषणा केली असली तरी श्री. कांदळगावकर यांनी पालकमंत्र्यांसह आमदार, खासदारांचे आभार मानले होते. कांदळगावकर यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देण्याची घोषणा केली असली तरी शिवसेनेतील गटातटाच्या राजकारणाला कंटाळून महेश कांदळगावकर यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा शहरात सुरू होती. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी शिवसेनेच्या नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांसह शनिवारी महेश कांदळगावकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आगामी नगरपालिका निवडणूक महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे जाहीर करून आम्ही सर्वजण आणि शिवसेना पक्ष महेश कांदळगावकर यांच्या पाठीशी असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी जाहीर केले होते. याचवेळी शिवसेनेतील नाराज गटाला खासदार विनायक राऊत यांनी इशारा देतानाच पक्षसंघटना खिळखिळीत करण्याचे प्रयत्न कदापि सहन करणार नाही, असे सुनावले होते. त्यामुळे आमदार, खासदारांच्या भेटीनंतर महेश कांदळगावकर नेमका कोणता निर्णय घेणार ? याकडे शहरवासीयांचे आणि त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले होते.

दरम्यान, महेश कांदळगावकर यांनी अद्याप आपली भूमिका अधिकृत जाहीर केली नसली तरी मंगळवारी शिवसेनेच्या दोन उपक्रमाना हजेरी लावत आपल्या भूमिकेबाबत योग्य तो संदेश दिला आहे.

मालवण रेवतळे हळदणकर घर, मुख्य रस्त्या नजीक असलेल्या जीर्ण पुलाचे नव्याने आरसीसी पद्धतीने बांधकाम करण्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते. या कामाच्या बांधकामाचा शुभारंभ मंगळवारी महेश कांदळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्या राणे यांच्या हस्ते करण्यात आला. तर मालवण तालुक्यात हमरस्त्यावर असणाऱ्या एका माध्यमिक शाळेत परजिल्ह्यातील १९ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेला बसण्यासाठीच नियमबाह्य पद्धतीने हा प्रवेश देण्यात आल्याचा आरोप शिवसेना आणि युवासेनेने करून या शाळेत धडक देत संपूर्ण कारभाराची पोलखोल केली. यावेळी देखील महेश कांदळगावकर यांची उपस्थिती दिसून आली. त्यामुळे महेश कांदळगावकर यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करून पुन्हा एकदा शिवसेनेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले आहे. महेश कांदळगावकर याना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे राजकारणात सक्रिय राहण्याच्या त्यांच्या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3583

Leave a Reply

error: Content is protected !!