अ. भा. कोकणी परिषदेचे मालवणात अधिवेशन ; गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
दोन दिवस रंगणार कोंकणी भाषिकांचा मेळा ; सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल
परिषदेच्या अध्यक्षा सौ. उषा राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती
कुणाल मांजरेकर
मालवण : अखिल भारतीय कोंकणी परिषदेचे ३२ वे अधिवेशन मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे १४ व १५ मे रोजी होणार आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती अ. भा. कोंकणी परिषदेच्या अध्यक्षा सौ. उषा राणे यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
मालवण धुरीवाडा येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित पत्रकार परिषदेत उषा राणे या बोलत होत्या. यावेळी कोंकणी परिषदेचे सचिव गौरीश वेर्णेकार, खजिनदार शशिकांत पुनाजी, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रुजरिओ पिंटो, कार्याध्यक्ष रेनॉल्ड बुतेलो, सहसचिव जेम्स फर्नांडिस आदी उपस्थित होते. यावेळी सौ. राणे म्हणाल्या, अखिल भारतीय कोंकणी परिषदेची स्थापना १९३९ साली झाली. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ व दिल्ली अशा चार राज्यात ही परिषद कार्यरत आहे. कोंकणी भाषिक लोकांना एकत्र आणणे, त्यांना मंच उपलब्ध करून देणे, कोंकणी संस्कृती व साहित्य यांचे जतन करणे ही या परिषदेची उद्दिष्टे आहेत. यावर्षी संस्थेला ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. गोवा येथे परिषदेचे स्वतंत्र कार्यालय नुकतेच सुरू करण्यात आले आहे. एक वर्षी अधिवेशन तर एक वर्षी कोंकणी साहित्य संमेलन या परिषदेतर्फ़े घेण्यात येते. कोरोना महामारीमुळे गेले दोन वर्षे अधिवेशन घेता आले नाही. त्यामुळे यावर्षी ३२ वे अधिवेशन मालवण येथे आयोजित केले आहे, असे यावेळी उषा राणे यांनी सांगितले.
दि. १४ मे रोजी या अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून उद्घाटक म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून गोव्याचे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्यासह ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो, परिषदेचे भावी अध्यक्ष अरुण उभयकर, आमदार वैभव नाईक, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात चार सत्रांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये १४ मे रोजी सकाळच्या सत्रात गोवा सरकार प्रशासनामध्ये आणि केंद्रीय आस्थापनामध्ये कोंकणी भाषेचा वापर या विषयावर परिसंवाद, तर सायंकाळच्या सत्रात नव्या कोंकणी कवींचे संमेलन होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दि. १५ मे रोजी सकाळच्या सत्रात घाट प्रदेशात कोंकणी भाषेचे व संस्कृतीचे जतन यावर चर्चासत्र आणि ज्येष्ठ कवींचे संमेलन होणार आहे. तर सायंकाळच्या सत्रात कोकणातील समुद्र किनारी भागातील कोंकणी कला व व्यवसाय यावर चर्चासत्र होणार आहे. या अधिवेशनाच्या कार्यक्रम स्थळास बॅ. नाथ पै नगरी, व्यासपीठास मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी व प्रवेशद्वारास स्व. बिशप व्हेलेरियन डीसोजा अशी नावे देण्यात आली आहेत. तरी या अधिवेशनास कोंकणी बांधवानी उपस्थित राहावे, असे आवाहन यावेळी अखिल भारतीय कोंकणी परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.