आ. अमोल मिटकरींची किल्ले सिंधुदुर्गला भेट !
या मातीला वंदन करता आले हे भाग्यच : मिटकरींची प्रतिक्रिया
कुणाल मांजरेकर
मालवण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा विधान परिषद आमदार अमोल मिटकरी यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट देऊन पाहणी केली. यावेळी किल्ल्याच्या सौंदर्याने प्रभावित होऊन या मातीला वंदन करता आले हे माझे भाग्यच असल्याची प्रतिक्रिया आ. मिटकरींनी व्यक्त केली आहे. ट्विटरवरून त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.
विधिमंडळ रोजगार हमी योजना समिती गुरुवार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाली आहे. या समितीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांचा देखील समावेश आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने ते बुधवार पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. बुधवारी त्यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. यानंतर ट्विट करून आ. मिटकरींनी आपली भावना व्यक्त केली आहे.
“आज छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला जलदुर्ग सिंधुदुर्ग किल्ला बघितला. महाराजांनी उभारलेली ही ” शिवलंका!” या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे आहेत, आज या मातीला वंदन करता आले हे माझे भाग्यच…” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बुधवारी किल्ल्याला भेट दिल्यानंतर गुरुवारी देखील आ. मिटकरी यांनी किल्ले सिंधुदुर्गला भेट दिली. यावेळी स्थानिक रहिवाशांकडून त्यांनी किल्ल्याची माहिती घेतली. यावेळी समितीचे अन्य सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.